दिवस मंदीचे सुरू जाहले… चारा कुजला… बैल हडकुळले…

540

‘दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले’ ही कविता प्रत्येकाने लहानपणी ऐकली आहेच. मात्र परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केल्याने शेतकऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पावसामुळे जनावरांचा चाराही कुजला असून जनावरांनीही माना टाकल्या आहेत. त्यामुळे बाजारात आणलेले बैल हडकुळलेले असल्याने त्यांना अपेक्षित किंमत मिळत नाही. त्यामुळे कमी भावात बैल विकण्यापेक्षा त्यांना घरी नेलेले बरे असा विचार करून शेतकऱयांनी विक्रीसाठी आणलेले बैल पुन्हा घरी नेले.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु दुर्दैवाने यंदाही पिच्छा सोडला नाही. पावसाचे पाणी लागल्याने दाणे काळवंडले. पावसानंतर ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे जमिनीवर आडव्या पडलेल्या ताटव्यांवर बुरशी निर्माण झाली. चाराही काळवंडला. चाऱयाला दर्प येऊ लागला. साहजिकच हा कडबा जनावरांपुढे टाकल्यानंतर जनावरे खात नाहीत. अन्नधान्य पुरेशा प्रमाणात आलेले नाही. जेथे स्वतःच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होणार आहे तेथे शेतीपयोगी बैल आणि इतर जनावरांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱयांसमोर निर्माण झाला आहे.

चाऱयाचा प्रश्न गंभीर

भविष्यातील महागणारा चारा पाहता अनेक शेतकऱयांनी बैलजोडी आठवडा बाजारात विक्रीस आणली, परंतु खरेदीदारासमोरदेखील चाऱयाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे बैल घेणाऱयांनी फारच कमी किंमत सांगितली. काही शेतकऱयांनी बैलजोडी माघारी नेण्याचे ठरविले तर काहींनी हतबल होत मिळेल त्या किमतीत बैलजोडी विकली.

 

आपली प्रतिक्रिया द्या