
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी राज्यातल्या सुमारे तीन हजार लहान-मोठय़ा धरणांतील पाणीसाठा अजून फक्त 29 टक्क्यांवरच आहे, तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या आणि वीजनिर्मितीची भिस्त असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा अद्याप फक्त 15.86 टक्केच आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा फक्त 10.86 टक्के आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची भीती आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने पावसाळय़ात दररोज राज्यातल्या धरणातील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार राज्यात लहान-मोठी अशी 2 हजार 989 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 29.15 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी 38.21 टक्के पाणीसाठा होता.
पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. सध्या धरणात प्रत्यक्षात 10.86 टक्केच पाणीसाठा आहे, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागातील एका अधिकाऱयाने दिली. पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे सिंचन, पिण्याचे पाणी व वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या आहेत.
चौथा टप्पा बंद
शिल्लक पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केल्यामुळे जलविद्युत प्रकल्पाचा एक हजार मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प जून महिन्यातच बंद केला आहे. अन्य प्रकल्प काही मिनिटांसाठी चालू करून बंद केले जात असल्याचे सांगण्यात येते.
मुंबईची स्थिती समाधानकारक
भातसा धरणात सध्या 36.95 टक्के पाणीसाठा आहे, पण मागील वर्षी याच दिवशी 47.57 टक्के पाणीसाठा होता. मध्य वैतरणामध्ये मागील वर्षी या दिवशी फक्त 22.10 टक्के पाणीसाठा होता, पण आताच्या घडीला 32.64 टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये 61.79 टक्के, तानसा धरणात 56.40 टक्के पाणीसाठा आहे.




























































