सोलापूर जिल्हा बँकेला दणका; संचालक मंडळ बरखास्त

28

सामना प्रतिनिधी । सोलापूर

राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या सोलापूर जिल्हा बँकेला कोटय़वधी रुपयांच्या थकबाकीमुळे दणका देण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या शिफारशींनुसार सहकार खात्याच्या कलम ११० (अ) अन्वये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. जिह्याचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार घेतला. दरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची धाडसी कारवाई सुरू केली असतानाच आता राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेलाही मोठा दणका दिला आहे.

सोलापूर जिह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेते मंडळींच्या कारखाना व संस्थांकडे जिल्हा बँकेची सुमारे ६५० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे बँकेचा ‘एनपीए’ वाढला. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने याची गंभीर दखल घेतली. यंदाच्या ताळेबंदात ३४२ कोटींची ‘एनपीए’ची तरतूद करण्यात आली आहे. या बँकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार विद्यमान आमदार, एक खासदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह जिह्याच्या राजकारणातील माजी मंत्री, माजी आमदार आदी दिग्गजांचा समावेश आहे. अडीच वर्षांपूर्वी हे संचालक मंडळ बँकेवर निवडून आले होते. दरम्यान,जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त करून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार, खासदारांना मोठा दणका दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या