समुपदेशकांकडे पेपरतपासणीच्या कामाची चौकशी, परीक्षार्थ्यांना सतत ‘बिझी’ टोन

248

परीक्षेदरम्यान मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली हेल्पलाइन काही मॉडरेटर्स आणि नियामकांमुळे सतत ‘बिझी’ आहे. या हेल्पलाइनवर मॉडरेटर्सच आपल्या व्यथा मांडत असून ‘पेपरतपासणीसाठी बोर्डाकडून अद्याप विचारणा झालेली नाही’, असे सांगत आहेत. ‘सहकारी शिक्षकाला पेपरतपासणीसाठी बोलावणे आले आहे. मला कधीपर्यंत कॉल येईल’, अशी चौकशीही हेल्पलाइनवरील समुपदेशकांकडे होत आहे.

18 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. यादरम्यान तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडाळांमार्फत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या हेल्पलाइन क्रमांकावर परीक्षार्थी, पालकांबरोबच शिक्षकांचे फोनही खणाणत आहे. परीक्षार्थ्यांकडून हॉलतिकीट हरविल्याबाबत, बैठक क्रमांक, कोणत्या शाईचे पेन वापरावे यापासून अभ्यास झाला नाही, दडपण आले आहे, परीक्षा केंद्राची चौकशी करण्याविषयीचे कॉल येत असताना बारावीचे काही शिक्षक पेपरतपासणीच्या कामाची विचारणाही या हेल्पलाइनवर करीत आहेत. मात्र या शिक्षकांना त्यांच्या प्रश्नांचे काहीच उत्तर समुपदेशक देऊ शकत नाही.

यंदा पत्राद्वारे नेमणूक नाही; एसएमएस पाठवले

यंदा शिक्षण मंडळाने मॉडरेटर्स म्हणून नेमणूक पत्र शिक्षकांना पाठविलेले नाही. त्याऐवजी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहेत. आता हे एसएमएस किती शिक्षकांना मिळाले, किती शिक्षकांनी पाहिले हा संशोधनाचा विषय आहे.

डुप्लिकेट मार्कशीटचीही चौकशी

याआधी दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थीही हेल्पलाइन सुरू झाल्यावर डुप्लिकेट मार्कशीटविषयी या हेल्पलाइनवरच चौकशी करीत असल्याचे बोर्डाच्या समुपदेशकांनी सांगितले. डुप्लिकेट मार्कशीट मिळविण्यासाठी काय करावे लागेल, अर्ज कसा लिहावा, याची विचारणाही परीक्षा काळातच काही विद्यार्थी करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या