#MahaElection – मुंबईत अपक्ष उमेदवारांच्या संख्येत घट

590

#MahaElection 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मुंबईच्या एकूण 36 विधानसभा जागांवर अपक्ष उमेदवारांच्या संख्येत घट झाली आहे. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 मध्ये मुंबईच्या 36 जागांवर 333 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ज्यातील 91 उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 2009 मध्ये या 36 जागांसाठी 424 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ज्यातील 194 अपक्ष उमेदवार होते. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 517 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, जातील 174 हे अपक्ष उमेदवार होते.

तज्ज्ञांच्या मते, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने उमेदवारांची संख्या वाढली होती.

स्वतंत्र राजकीय विश्लेषक नीलू दामले यांनी याबाबत सांगताना म्हणाले की, आर्थिक मंदीमुळे ही घसरण झाली आहे. अनेक उमेदवार मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी निवडणुकीत उभे राहतात. तसेच काही राजकीय पक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी पैसे देऊन सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार उभे करतात. मात्र सत्तेत नसलेल्या इतर राजकीय पक्षांकडे पैसा नसल्याने. यावेळी अपक्ष उमेदवरांच्या संख्येत घट झाली आहे, असे दामले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुंबईमधील 36 जागांपैकी काही जागांवर अपक्ष उमेदवार उभे नाही आहेत. यामध्ये बोरिवली, कांदिवली (पूर्व), कुर्ला, वांद्रे (पश्चिम), सायन आणि सेवरी यासारख्या जागांचा समावेश आहे. दुसरीकडे चांदिवली, घाटकोपर (पश्चिम), अणुशक्ती नगर आणि वरळी येथे प्रत्येक जागेवर सात अपक्ष उमेदवार उभे आहेत.

सद्य परिस्थितीत मुंबईतील 36 जागांपैकी एकही जागेवर अपक्ष उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेले नाहीत. या 36 जागांपैकी 15 जागांवर भाजप, 14 जागांवर शिवसेना, 5 जागेवर काँग्रेस, 1 जागेवर समाजवादी पार्टी आणि 1 जागेवर एमआयम पक्षाचे आमदार निवडणून आले आहेत. एकंदरित महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. ज्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या