
महाराष्ट्रातील महापुरामुळे तिसऱया सत्रातील जेईई-मेन परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा येत्या 3 आणि 4 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून त्या परीक्षेची प्रवेशपत्रे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आज उपलब्ध करून दिली. रायगड, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारामध्ये महापुरामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे या भागांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे होती त्या विद्यार्थ्यांचीच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.
जेईई-मेन परीक्षेचे तिसरे सत्र 25 जुलै आणि 27 जुलै रोजी पार पडले. महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसता आले नव्हते. त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले होते. बहरीन येथेही लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांना तिसऱया सत्रातील जेईई परीक्षा देता आली नव्हती. त्यांचीही परीक्षा 3 ते 5 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे ‘एनटीए’ने जाहीर केले आहे. पेपर-1 (बी. ई./ बी. टेक) 3 आणि 4 ऑगस्ट रोजी तर पेपर-2 ए आणि 2 बी (बी. आर्क./ बी. प्लॅनिंग) 5 ऑगस्ट रोजी घेतला जाणार आहे.



























































