
राजस्थानमधील पोखरण येथील रणरणत्या उन्हात तयार होणारी सौरऊर्जा आता महावितरणला म्हणजे महाराष्ट्राला मिळणार आहे. महावितरणने 2018 मध्ये 150 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीचे काम टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला दिले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून 2 रुपये 72 पैसे प्रतियुनिट दराने ही वीज पुढील 25 वर्षे महावितरणला मिळणार आहे. अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने सुमारे एक गिगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर काढले होते. त्यानुसार टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टीपीआरएएलने प्रकल्प उभारून तयार होणारी वीज महावितरणला देण्याबाबत करार झाला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून 220 केव्हीच्या पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या भडळा वीज उपकेंद्राला जोडली आहे. त्यामुळे महावितरणला आपले अपारंपरिक ऊर्जा खरेदीचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे.



























































