
35व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेतेपदाचा झेंडा फडकावला. किशोरी संघाने सलग आठव्यांदा विजेतेपद पटकावत सोनेरी इतिहास रचला, तर किशोर संघाला मात्र यंदा तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
हरियाणातील थीम पार्क मैदानावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानवर पूर्ण वर्चस्व गाजवत एक डाव आणि 12 गुणांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्याच आक्रमणात महाराष्ट्राने निर्णायक आघाडी घेत राजस्थानला कोणतीही संधी दिली नाही. वेगवान खेळ, अचूक बचाव आणि आक्रमणातील धार यामुळे सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. महाराष्ट्राकडून राही पाटील, वेदिका तामखेडे, अपर्णा वर्दे, ऋतुजा सुरवसे आणि पियुशा परमाळकर यांनी उत्पृष्ट समन्वय साधत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून तुलसी, गुंजन आणि राधिका यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापुढे तो अपुरा ठरला.
किशोर गटात मात्र यंदा महाराष्ट्राची विजयी मालिका खंडित झाली. अंतिम सामन्यात ओडिशाने कोल्हापूरवर विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. ओडिशाकडून सत्यरंजन, चिन्मय अम्रिता आणि अमरज्योती यांनी दमदार खेळ साकारत संघाला विजेतेपद मिळवून दिले. कोल्हापूरकडून देवराज येड्राव आणि गौरव माने यांनी लढत दिली, मात्र सामना ओडिशाच्या बाजूने झुकला.
याआधी झालेल्या किशोर गटाच्या उपांत्य फेरीत ओडिशाने महाराष्ट्रावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला आघाडी असूनही दुसऱया डावात ओडिशाच्या आक्रमक खेळामुळे महाराष्ट्राचा डाव कोलमडला. ओडिशाकडून सत्या आणि चिन्मय यांनी निर्णायक भूमिका बजावली, तर महाराष्ट्राकडून वरद पोळ आणि कर्तव्य गादेकर यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. या पराभवानंतर महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकांतही महाराष्ट्राने आपले वर्चस्व दाखवले. किशोरी गटात राही पाटील हिने उत्पृष्ट संरक्षकाचा मान पटकावला, तर अपर्णा वर्दे हिला देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा इला पुरस्कार मिळाला. किशोर गटात वरद पोळ याला उत्पृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळाला, तर ओडिशाच्या सत्या राजन बेहरने भरत पुरस्कार जिंकला.




























































