1 जूननंतरच दुसरा डोस मिळणार, आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक कर्मचाऱयांना मात्र ठरल्याप्रमाणे डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या दुसऱया डोसचा कालावधी 12 ते 16 आठवडय़ांनी वाढवल्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी 1 मार्चला पहिला डोस घेतला आहे त्यांना आता 1 जूननंतरच दुसरा डोस मिळणार आहे. मात्र आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना मात्र दुसरा डोस 42 दिवसांनंतर घेता येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि मुंबई महापालिकेकडून अहोरात्र मेहनत घेतली जात असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईत सध्या पालिका, राज्य आणि खासगी केंद्रांची संख्या 147 पोहोचली असून येत्या काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱया डोससाठी असलेला कालावधी 12 ते 16 आठवडय़ांवर म्हणजे तीन ते चार महिन्यांवर नेला आहे. कोव्हिशिल्डच्या तुटवडय़ामुळे दुसऱया डोसचा कालावधी वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्यांना मात्र पहिला डोस घेता येणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईत आतापर्यंत 21 लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 7 लाख लोकांना दुसरा डोस घेतला आहे.

मंगळवार ते गुरुवार ज्येष्ठांचे थेट लसीकरण

मुंबईत तिसऱया टप्प्यात 18 ते 44 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. मात्र कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तुटवडय़ामुळे 45 वर्षे आणि ज्येष्ठांना पहिला आणि दुसरा डोस मिळवण्यासाठी लसीकरण केंद्रांवर हेलपाटे घालावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर 18 ते 45 वर्षांवरील लसीकरण काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईत ज्या ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला नाही अशांसाठी सोमवार ते बुधवार नोंदणी न करताही लसीकरणाची थेट विशेष सुविधा देण्यात आली होती. मात्र ‘तौकते’ वादळामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुबंई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता हे थेट लसीकरण मंगळवार, 18 ते गुरुवार, 20 मे रोजी होणार आहे.