समान कार्यक्रम ठरला, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सत्तास्थापनेच्या दिशेने दमदार पाऊल…

3630

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दमदार पाऊल उचलले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या पार पडलेल्या संयुक्त बैठकीत आज किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे अंतिम निर्णय घेणार आहेत.

 बैठकीनंतर याविषयीची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या समान कार्यक्रमांसंदर्भात बैठक झाली. प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा झाली असून किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक गुरुवारी वांद्रे येथील एमईटी येथे पार पडली. या बैठकीला  शिवसेना नेते सुभाष देसाई, विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे  नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, नकाब मलिक आणि काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित आहेत. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक सायंकाळी 7.00 वाजता संपली. या बैठकीत शिवसेना तसेच आघाडीच्या जाहीरनाम्याबाबत चर्चा करून किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला.

मुख्यमंत्रीपदाची काँग्रेसची मागणी नाही

या बैठकीत सत्तावाटपाबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसची मागणी नाही. ही अफवा आहे. हायकमांडपासून अन्य कोणीही तशी बोलणी केलेली नाहीत. सत्तेतला सहभाग किंवा सत्तेत बाहेरून पाठिंबा हा विषय महत्त्वाचा नाही. सत्ता स्थापन करणे, सरकार बनवणे यापुरते मर्यादित न राहता सत्ता चालवणे हे महत्त्वाचे असल्याचे वड्डेटीवार म्हणाले. राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे ही शेतकऱ्यांचीही इच्छा असून त्यानुसार सर्व पक्ष एकत्र बसून लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या