शिवसेना आणि आघाडीची चर्चा योग्य दिशेने! किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी समित्या

603

विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटला नाही, असे सांगत केंद्र सरकारने महाराष्ट्रात राज्यपालांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला असला तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना आणि आघाडीची चर्चा योग्य दिशेने सुरू असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठकही रात्री पार पडली. आणखी काही दिवस हा बैठकांचा सिलसिला असाच सुरू राहणार असून राज्यात निश्चितच स्थिर सरकार देणार, असा विश्वास तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये सरकारच्या किमान समान कार्यक्रमावर सध्या चर्चा सुरू आहे. हा किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापली समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ गटनेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचा समितीत समावेश आहे, तर काँग्रेसच्या समितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांचा समावेश आहे.

एकवाक्यता होण्यात अडचण नाही!

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबद्दल स्वतंत्र चर्चा झाली आहे. निवडणुकीत दोन्ही पक्षांचा जाहीरनामा एकच होता. त्यामुळे आमच्यात एकवाक्यता होण्यास अडचण येणार नाही. मात्र आमच्यातील चर्चा झाल्यावर शिवसेनेशी कोणत्या मुद्दय़ावर चर्चा करायची ते आमचे नेते ठरवतील, असे अजित पवार यांनी सांगितले. सरकार स्थापनेबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा आशावादही अजित पवार यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या