पोलिसांची फीत वाढली, 1061 अंमलदार झाले उपनिरीक्षक

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील 1061 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर पदोन्नती दिली आहे. पोलीस पदोन्नतीची परीक्षा दिल्यानंतरही पोलीस अंमलदारांना 2013 नंतर ही पदोन्नती मिळाली नव्हती. यासाठी पोलीस महासंचालकांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला होता अखेर महाविकास आघाडी सरकारने या पोलिसांचे ‘पीएसआय’ होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

पोलीस कर्मचारी अधिकारी म्हणून निवृत्त व्हावा ही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची संकल्पना होती. त्यानुसार पदोन्नतीसाठी परीक्षाही घेण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्या पोलिसांपैकी काहींना पदोन्नती मिळाली मात्र 2013 नंतर ही पदोन्नती झालीच नाही. महाविकास आघाडी सरकारने ही पदोन्नती पुन्हा सुरू केली. पोलीस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभागप्रमुख राजेश प्रधान यांनी 1061 पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून पदोन्नती दिल्याची यादी प्रकाशित केली. पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर देण्यात आलेल्या पदोन्नतीमुळे पोलीस दलामध्ये उत्साह संचारला आहे.

आणखी जोमाने काम करा!

नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आह. प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले असल्याचे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पदोन्नती झालेल्या अधिकाऱयांना शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या