नव्या बस-टॅक्सीत ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ व ‘पॅनिक बटण’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातल्या सार्वजनिक सेवेतील प्रत्येक नव्या वाहनाला ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ आणि ‘पॅनिक बटण’ बसविले आहे की नाही याची खातरजमा आरटीओ नवे वाहन रजिस्ट्रेशन करताना करणार आहे. बसेस आणि टॅक्सींना हा नियम लागू करण्यात आला आहे. आता जुन्या सार्वजनिक वाहनांना यातून सूट कधीपर्यंत द्यायची याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

25 ऑक्टोबर 2018 रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने परिपत्रक काढून 1 जानेवारी 2019पासून प्रत्येक नव्या सार्वजनिक वाहनाला व्हेईकल ट्रकिंग सिस्टम आणि पॅनिक बटण बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सध्या वापरात असलेल्या वाहनांबाबतचा निर्णय राज्य सरकारावर सोपविला होता. व्हेईकल टॅकिंग सिस्टममध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे उपग्रहांच्या मदतीने गाड्यांचा माग राखता येणार आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग, बेदरकारपणे गाड्या चालविणे, ओव्हरटेक करणे अशा सर्व प्रकारांवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच ट्रॅफीक जाम होण्यासारख्या प्रसंगात वाहनांना शिस्त लावणे, अपघातासारख्या प्रसंगात नोंदी ठेवणे सोपे होणार आहे. शिवाय रिअल टाईम लोकेशनमुळे प्रवाशांना त्यांची बस किंवा टॅक्सी किती वेळात येणार यासारखी माहिती ऍपवर देणे सोपे होणार आहे.

  • ‘पॅनिक बटण’ दाबताच आपातकालीन वेळेत पोलिसांची मदत मिळणे सोपे होणार आहे. बेस्ट आणि एसटीच्या बसेस काळी-पिवळी टॅक्सीसह सर्व प्रकारच्या ऍप आधारित टॅक्सींना रजिस्ट्रेशन करताना ही सर्व यंत्रणा बसविल्यावरच वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात सध्याच्या वापरातील वाहनांनाही ही यंत्रणा लावण्यासाठीची मुदत लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.