
थंडीने काढता पाय घेतल्यानंतर आता अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. आग ओकणारा सूर्य आणि गरम वाफा अशा भट्टीत ठाणेकर सध्या उकडून निघत आहेत. घरातील पंखे, एसी, कुलर ऑन झाले असून अनेकांची पावले आईस्क्रीम, सरबत, ताक, लस्सी पिण्यासाठी वळू लागली आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेने ठाणे सुपर ‘हिट’ ठरले. सोमवारी पाऱ्याने 43 चा आकडा गाठल्याने ठाणेकरांचा ‘ताप’ आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गुलाबी थंडीने फेब्रुवारी अखेरपर्यंत मुक्काम ठोकला होता. मार्च महिना उजाडताच उष्णतेने आपले रूप दाखवायला सुरुवात केली. निसर्गाचा ढासळलेला समतोल, शहरातील वाढती लोकसंख्या, रस्त्यांवर धावणारी वाहने यामुळे पायाचा सूर दिवसेंदिवस टीपेला पोहोचत चालला असून ही ग्लोबल वॉर्मिंगचीच चाहूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 28 फेब्रुवारी रोजी 39 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. 1 मार्चला ते 40 वर आले. आज तर कहरच झाला. ४३ वर हा आकडा गेला आहे.
दोन दिवस घराबाहेर पडू नका
गेल्या दोन-तीन दिवसांपासून घड्याळात 9 चा आकडा दिसला तरी चटके बसू लागतात. दुपारी 12 च्या सुमारास तर घराबाहेर पडणेही मुश्कील आहे. पंखे फास्ट मोडवर तर एसी 20 डिग्री वर आला आहे. गरीबांचा फ्रिज असलेला माठ महाग झाला असला तरी तो विकत घेण्यासाठी हातगाड्यांवर गर्दी दिसू लागली आहे. हवामान खात्याने 15 व 16 मार्च या दरम्यान ठाण्यासह रायगड व पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात दुपारी 12 ते 4 पर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
रायगडकरही हैराण
रायगडचे तापमान आता 40 अंशांवर जाऊ लागले आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम रायगडकरांना सहन करावा लागत आहे. तीन महिने थंडीने कुडकुडलेला रायगडकर आता उष्णतेने हैराण झाला आहे. दरम्यान वाढत्या उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.































































