
सीमाभागातील मराठी भाषक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या जिवावर उठण्याचीच भाषा करणाऱया, तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया कानडी भुरटय़ा नेत्यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून दोन्ही बाजूंची बससेवाही बंद करण्यात आली आहे. दुपारी संतप्त शिवसैनिकांकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार निदर्शने केली. युवासैनिकांनी चित्रपटगृहात घुसून कानडी चित्रपट बंद पाडला. तसेच करवीर शिवसेनेच्या वतीने कानडी फलकांना काळे फासून तीव्र निषेध करण्यात आला.
विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सीमाभागातील मराठी भाषक पाकिस्तानात राहतात का’ असा सवाल करीत, भाषावार प्रांतरचनेपासून गेली 64 वर्षे कानडी अत्याचारांचा मुकाबला करीत महाराष्ट्रात येण्यासाठी लढणाऱया सीमाभागातील मराठी भाषकांकडे लक्ष वेधले होते. याचेच पोटशूळ उठल्याने ‘कर्नाटक नवनिर्माण सेने’चा भुरटा स्वयंघोषित नेता भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाच गोळ्या घालण्याची माथेफिरू भाषा केली. शिवसैनिकांसह सीमालढय़ाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यात दैनिक ‘सामना’मधील अग्रलेखाने तर त्या भुरटय़ाची बोलतीच बंद झाली होती. त्यामुळे बिथरलेल्या मूठभर कानडी नेत्यांपैकी अडगळीतील होरट्टी या माजी कानडी मंत्र्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढून वातावरण भडकविण्याचा प्रयत्न केला. त्यात ‘कन्नड रक्षक वेदिका’ या कानडी संघटनेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला. शिवाय अंधारात दुकानांवरील मराठी फलकांवरही दगडफेक करून सीमाभागातील वातावरणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या भुरटय़ा कानडी तथाकथित नेत्यांच्या कृत्याला सीमाभागातील मराठी भाषकांनी कसलीच भीक घातली नाही. पण कोल्हापुरात मात्र मराठी भाषकांच्या या गळचेपीचे पडसाद उमटले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरील कागल येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली भुरटय़ा भीमाशंकर पाटील याची तिरडी काढून निषेध करण्यात आला. सायंकाळी युवासेनेच्या वतीने हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि माजी मंत्री होरट्टी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांवर काळी शाई ओतून कोल्हापुरी जोडय़ांचा प्रसाद देण्यात आला.
आज संजय पवार, विजय देवणे आणि मुरलीधर जाधव हे तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुख, तसेच खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली सकाळी येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून निषेध रॅली काढण्यात आली. त्या भुरटय़ा कानडी नेत्यांच्या तोंडाला लगाम घालावा, अशी मागणी करीत कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. लाल-पिवळ्या कपडय़ात गुंडाळलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढत वर्दळीच्या दाभोळकर कॉर्नर चौकात त्याचे जाहीर दहन करण्यात आले.
कन्नड रक्षण वेदिकेच्या नाकावर टिच्चून सीमावासीयांकडून आमदार राजेश पाटील यांचा सत्कार
चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी सरकार स्थापनेवेळी मराठी भाषिक सीमा बांधवांना स्मरून शपथ घेतली होती. तसेच, बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आज बेळगाव येथे आमदार राजेश पाटील यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी भाषकांचा कार्यक्रम उधळण्यासाठी राणी चन्नम्मा चौकात आलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांना कानडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
युवासैनिकांनी बंद पाडला कानडी चित्रपट
युवासेनेचे पदाधिकारी हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांनी दुपारी व्हिनस कॉर्नर परिसरातील अप्सरा थेएटरमध्ये घुसून तेथे सुरू असलेला कानडी चित्रपट बंद पाडला. यावेळी कर्नाटक प्रशासनाविरोधात घोषणा देणाऱया युवासैनिकांमुळे येथे लावलेल्या कानडी चित्रपटाचा फलकही थिएटरमालकाकडून उतरविण्यात आला.
महाराष्ट्र-कर्नाटक परिवहन बससेवा ठप्प
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून बेळगावात कन्नडिगांचा धुडगूस सुरूच आहे. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे दक्षता म्हणून रविवारी दोन्ही राज्यांतील बससेवा बंद ठेवण्यात आली होती. दुपारी दोनपर्यंत कोल्हापूर येथून कर्नाटकात जाणाऱया 231 फेऱया रद्द करण्यात आल्या. या भागात जाणाऱया प्रवाशांना खासगी बसेसचा आधार घ्यावा लागला. पुण्यातील शिवाजीनगर स्थानकातून रोज रात्री साडेअकरा वाजता बेळगाव गाडी सुटते, मात्र सीमाभागातील परिस्थिती विचारात घेता शनिवारी (दि.28) रात्री सुटणारी गाडी कोल्हापूरपर्यंतच सोडण्यात आली.
माथेफिरू कन्नड नेत्यांच्या मुसक्या आवळा – खासदार धैर्यशील माने
कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात राहणारे कन्नड बांधव अधिक सुरक्षित आहेत, परंतु कर्नाटकात राहणारा मराठी माणूस नेहमीच असुरक्षित राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र आणि शिवसेना सदैव उभी आहेत. तथाकथित कानडी नेत्यांनी मराठी भाषिक जनतेवर अन्याय केला तर गाठ शिवसेनेशी असल्याचा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला. तसेच बेताल वक्तव्य करून मराठी भाषिकांची गळचेपी करणाऱया त्या माथेफिरूंच्या मुसक्या कर्नाटक सरकारने आवळाव्या, त्यांना आवर घालावा, नाहीतर एकाही कन्नड नेत्याला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कानडी फलकांना काळे फासले
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ‘तावडे’ हॉटेल परिसरात कानडी फलकांना काळे फासण्यात आले. यावेळी मराठी भाषेच्या विरोधात गरळ ओकून दोन भाषकांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणाऱया कानडी नेत्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करीत त्या कानडी नेत्यांना पाठीशी घालणाऱया कानडी पोलीस प्रशासनाचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
































































