कोणत्याही चर्चेविना लोकायुक्त कायदा मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, मंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणारे महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आज विधानसभेत चर्चेविना मंजूर करण्यात आले. या विधेयकात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा समावेश करण्यात आल्याने सरकारच्या कारभारात पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे सांगितले.

फडणवीस म्हणाले, पूर्वीचा कायदा हा 1971 मधील असून त्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचासमावेशच नव्हता. समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत उपोषण केले होते. त्यानंतर आपण उच्चाधिकार समिती स्थापन केली. अण्णा हजारे यांचाही त्यात समावेश केला. जे मसुदे तयार व्हायचे त्यांना या समितीची मंजुरी घेतली जायची. त्यानंतर अखेर हे विधेयक तयार झाले.

खोटी तक्रार केली तर…
मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी यांना या कायद्याच्या कक्षेत आणले. मात्र कोणीही उठावे आणि खोटय़ा तक्रारी करू नयेत यासाठी काही उपाययोजनाही कायद्यात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी विधिमंडळाची, मंत्र्यांसाठी राज्यपाल तर लोकप्रतिनिधींसाठी विधानसभा अध्यक्ष तसेच विधान परिषद सभापती यांची अनुमती लागणार आहे. मात्र या कायद्यामुळे आता पूर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करता येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांच्या सभात्यागानंतर पुकारले विधेयक
शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळय़ावरून विधानसभेत विरोधी पक्षाने सभात्याग केला असताना प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजुरीसाठी मांडले. विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित नसल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे विधेयक पुकारून मंजूर झाल्याचे घोषित केले.