लॉकडाऊन वाढणार काय? आज बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 23 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. 1 मेनंतर या निर्बंधात 15 मेपर्यंत वाढ करण्यात आली. ‘ब्रेक दी चेन’नंतर लागू करण्यात आलेले हे निर्बंध पुढे वाढणार का? का हे नियम आणखी कडक केले जाणार याबाबत तर्कवितर्क लाकले जात आहेत. मात्र याबाबत उद्याच्या बैठकीतच निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली. मात्र काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर 15 मेनंतर कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल होणार का याबाबत उद्या होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा आहे. सध्या रेल्वे प्रवासाला केवळ आरोग्य कर्मचारी, रुग्ण आणि सरकारी कर्मचाऱयांनाच परवानगी आहे. अन्य कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे अत्यावश्यक दुकानांना केवळ सकाळी 7 ते 11 पर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे. हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होतील का याबाबत चर्चा सुरू आहे.

100 टक्के निर्बंध शिथिल होणार नाहीत

काही निर्बंध कमी अधिक प्रमाणात बदलले जातील पण संपूर्ण निर्बंध हटविण्याची शक्यता नाही. सगळं लगेच 100 टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल, असा माझा अंदाज आहे. पण पूर्ण निर्बंध काढून 100 टक्के मोकळिक होईल असं होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.