हा तर भाग्याचा क्षण! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. ही भाषा आपणच टिकवली पाहिजे. मराठी भाषेची संपत्ती जपण्याचे काम आजच्या पिढीने नाही केले तर पुढच्या पिढय़ा काय करतील? आपण मिळवलेले मराठीचे हे वैभव करंटेपणाने गमावले जाऊ नये हाच मराठी भाषा सक्तीमागचा उद्देश आहे. माझ्या काळात हे विधेयक मंजूर होते याचा अभिमान वाटतोय! माझ्यासाठी हा अत्यंत भाग्याचा क्षण आहे अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. मराठी भाषेची ताकद संपूर्ण देशाला दाखवून देऊ, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.

मराठी शिकवा नाहीतर एक लाखाचा दंड! सर्वच शाळांत मराठी सक्तीची

 

महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याच्या विधेयकावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. जीवनाचे सार सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची भाषा आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठी भाषा आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे विचारून इंग्रजांना वठणीवर आणणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाषावार प्रांतरचना मराठी भाषेच्या आधारावरच केली ना. मुंबई मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची ही भाषा आहे. मग अशा मराठी भाषेला अभिजात भाषा करण्यासाठी पुरावे कशाला हवेत? मराठी भाषेचे मूळ शोधणे अन्याय आहे असे ठणकावून सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, इतिहास, परंपरा आणि संस्काराची भाषा असलेला मराठी भाषा सक्तीचा विषय सभाग्रहात एकमताने मंजूर होत आहे हा माझ्यासाठी आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. शिवसेनेची स्थापना मराठी अस्मिता आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या त्यांच्या खंद्या वीरांनी मराठी विषयाचा प्रस्ताव मांडावा म्हणून सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मांडण्यास सांगितले याचा आवर्जून उल्लेख करून शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून माझ्या काळात हा कायदा मंजूर होतोय याचा मला अभिमान वाटतो अशी भावना व्यक्त केली. कर्नाटकमधील मराठी भाषिक सीमा बांधवांवर कानडी भाषेची सक्ती केली जात आहे असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहाला आश्वस्त करीत म्हणाले, मराठी भाषा अमृतापेक्षा गोड आहे म्हणून मराठी भाषेची सक्ती नाही तर गोडीने आम्ही शिकवणार. मराठी भाषा विषयाचा कायदा होतोय त्याला सर्वांनी मनापासून पाठिंबा दिला. मराठी भाषेची ताकद संपूर्ण देशाला दाखवून देऊ!

आज मला शाळेतील पहिला दिवस आठवला. माझा हात हातात घेऊन पाटीवर अ, आ, इ, ई गिरवणारी माँ आठवली अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्याही भाषेचा दुस्वास करणे आम्हाला आजोबांनी, वडिलांनी शिकवले नाही. माझी मुले इंग्रजीत शिकतात यावरून टीका झाली, पण ती इंग्रजी शाळेत जाऊनही उत्तम मराठी बोलतात. इंग्रजी शाळेत, घरात मात्र मराठी आहे.

आज विधानसभेत विधेयक!
विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020च्या तिसऱ्या दिवशी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी तारांकित प्रश्नांद्वारे राज्यात सर्व मंडळाच्या शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षात मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही कुठपर्यंत आली आहे अशी विचारणा केली. यावर बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, उद्या विधानसभेत विधेयक मांडण्यात येईल. तसेच प्राथमिक सर्व शाळांत मराठी भाषा याच शैक्षणिक वर्षात अनिवार्य होईल. टप्प्याटप्प्याने पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यात येईल असे उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या