आमदार शिकणार फ्रेंच-रशियन भाषा, लोकप्रतिनिधींना देशी-विदेशी भाषा शिकवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांची लवकरच ऑनलाइन शाळा भरणार आहे. राज्यातील आमदारांना देशी व विदेशी भाषा शिकण्यासाठी ही ऑनलाइन शाळा भरवण्यात येणार आहेत. आमदारांना फ्रेंच, जर्मन, रशियन तसेच बंगाली गुजराती, मराठी, ओडिया भाषा शिकवण्यासाठी 22 जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत.

लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘क्षमता अभिवृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आमदार व विधान भवनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱयांना फ्रेंच, जर्मन, जपानी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश या आंतरराष्ट्रीय भाषा तसेच बंगाली, गुजराती, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू या भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भाषांचे वर्ग ऑनलाइन भरवण्यात येतील. आमदार व विधान भवनातील कर्मचारी व अधिकाऱयांच्या कुटुंबीयांनाही या भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 22 जून रोजी या भाषा प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाइन उद्घाटन होईल. हे प्रशिक्षण तीन महिन्यांचे असून एकूण तीस तासांमध्ये 24 वर्ग होतील. प्रत्येक आठवडय़ाला 75 मिनिटांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. 22 जूनपासून सकाळी 10 ते 11.15 आणि दुपारी 11.30 ते दुपारी 12.45 या वेळेत वर्ग भरतील. त्यानंतर 5 जुलैपासून दुपारी 2.30 ते 3.45 आणि दुपारी 3.45 ते संध्याकाळी 5 या वेळेत वर्ग भरवण्यात येतील.