
महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरीविरोधी वक्तव्ये करणारा कृषिमंत्री राज्याला नको, माणिकराव कोकाटेंना हटवा आणि नवा कृषिमंत्री द्या, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.शिवसेना खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग सोनावणे, धैर्यशील मोहिते-पाटील, विशाल पाटील, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर यावेळी उपस्थित होत्या. कृषिमंत्री कोकाटे यांच्या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि शेतकऱयांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषिमंत्री महाराष्ट्राला द्यावा, अशी मागणी चौहान यांच्याकडे केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी या भेटीनंतर ट्विट करून दिली.