पवन ऊर्जानिर्मितीत महाराष्ट्र पिछाडीवर; तामीळनाडू  गुजरात, कर्नाटक आघाडीवर

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशात वीजनिर्मितीबरोबरच विजेच्या मागणीमध्ये आघाडीवर असलेला महाराष्ट्र स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा अशी ओळख असलेल्या पवन ऊर्जानिर्मितीमध्ये मात्र पिछाडीवर आहे. सध्या महाराष्ट्राची एकूण वीजनिर्मिती क्षमता 43 हजार मेगावॅटच्या घरात असली तरी पवन ऊर्जानिर्मितीची क्षमता केवळ 4 हजार 700 मेगावॅटच्या घरात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सातव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर असलेल्या तामीळनाडूची सर्वाधिक आठ हजार  600 मेगावॅट असून त्यांनतर राजस्थान, गुजरात, कर्नाटक आंध्र प्रदेशचा क्रमांक लागत आहे.

wind-energy-stats

देशाची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाने 2022 पर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता 175 गिगावॅट म्हणजे तब्बल पावणेदोन लाख मेगावॅट वीज अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून तयार करण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प आणि पवन ऊर्जा प्रकल्पांचा मोठा वाटा असणार आहे. त्या दृष्टीने सर्वच राज्यांनी कंबर कसली असली तरी महाराष्ट्राची एकूण मागणी आणि सध्याच्या पवन ऊर्जानिर्मितीची क्षमता पाहता पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची सध्याची  22-24 हजार मेगावॅट एवढी असलेली मागणी सर्वाधिक आहे. पण पवन आणि सौरऊर्जा निर्मिती क्षमता मात्र कमी आहे. त्या तुलनेत तामीळनाडूची एकूण वीजनिर्मिती क्षमता 30 हजार मेगावॅट असूनही त्यामध्ये पवन ऊर्जेचा वाटा 8 हजार 600 मेगावॅट म्हणजे 28 टक्के एवढा आहे. त्यानंतर राजस्थान आपल्या क्षमतेच्या 20 टक्के पवन ऊर्जानिर्मिती करत असल्याचे केंद्रीय वीज प्राधिकरणाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.