सामाजिक न्याय विभागात सरमिसाळ, मंत्र्यांमध्ये अधिकारावरून लेटरवॉर; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला

मंत्र्यांच्या अधिकारावरून सामाजिक न्याय विभागात सरमिसाळ सुरू झाली आहे. मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी मिसाळ यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजप मंत्र्यांमध्ये वादावादी सुरू झाली आहे.  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचे आयोजन केल्यानंतर, संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली. त्याला प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ यांनी देखील पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलं दिले. मिसाळ एवढय़ावरच थांबल्या नाही तर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी फडणवीसांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले. तसेच समन्ववायातून उत्तम करावे, अशा सूचना देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी मिसाळ यांनी पत्राद्वारे शिरसाट यांना दिलेल्या प्रत्युत्तराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

मिसाळ यांच्या पत्रात काय?

n सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही.

n राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱयांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही.

n विभागाच्या राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिमत घेण्यात येत आहे.