
>> अमित घोडेकर
रोबो ही कल्पना आता परग्रहावरची किंवा परदेशातली राहिलेली नाही. आपल्या संभाजीनगर, नागपूरमध्ये रोबो वेटर अनेक तांत्रिक कामे पार पाडत आहेत.
गेल्या काही वर्षांत रोबोटिक्सच्या जगात अनेक बदल झाले आहेत आणि त्यात प्रचंड प्रमाणात उलथापालथदेखील होत आहे. आपल्या सगळय़ांना सोफिया नावाची रोबोट माहीतच आहे, जिने गेल्या दोन वर्षांत सगळय़ा जगात खूप धम्माल माजवली आहे. ड्रोन आणि रोबोटस्मुळे भविष्यात खूप धम्माल येणार आहे हे सगळय़ा जगाला कळून चुकले होते. त्यामुळेच अनेक मानवी कामे सध्या रोबोटस्च्या सहाय्याने केली जात आहेत.
रोबोटिक्सच्या दुनियेत किती मोठय़ा गोष्टी घडत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता साक्षात रोबोटस् मोठमोठे शिल्पदेखील बनवू शकतील. आजपर्यंत शिल्पकला हे क्षेत्र खूपच कुशल कारागिरी असणारेच लोक करत असत. त्यातदेखील हे काम प्रचंड क्लिष्ट आणि खूप एकाग्रता ठेवून करावे लागणारे काम होते, पण हेच काम आता रोबोटिक्सचा वापर करून केला जाणार आहे. संभाजीनगरमधील ग्राइंड मास्टर नावाच्या कंपनीने रोबोटस्चा वापर करून गौतम बुद्ध, गणपती बाप्पा तसेच इतर अनेक पुतळे चक्क रोबोटकडून बनवून घेतले आहेत. शिल्पकलेत सगळय़ात महत्त्वाचे काय असते तर डोळे आणि बुबुळाचे काम, पण तेदेखील रोबोटस् खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. रोबोट शिल्पकलेचे कामदेखील उत्तमरीत्या करू लागल्यामुळे भविष्यात शिल्पकला करणाऱया कलाकारांना मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कारण रोबोटस्मुळे खूप जास्त प्रमाणात वेळखाऊ आणि क्लिष्ट काम खूप झटपट होणार आहे.
रोबोटस्मुळे भविष्यात काय काय घडणार याची छोटीशी झलक आपल्याला आपल्याकडेच संभाजीनगर या औद्योगिक शहरात मिळत आहे. संभाजीनगर हे शहर त्याच्या ऑटोमोबाईल कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक गाडय़ांचे उत्पादन केले जाते. तसेच गाडय़ांसाठी लागणाऱया अनेक कच्च्या मालाचेदेखील उत्पादन केले जाते. पूर्वी जी कामे करण्यासाठी दोन दिवस लागत असत तीच कामे आजकाल कमी मनुष्यबळाचा वापर करून अर्ध्या दिवसात केली जातात. वेल्डिंग करणे, रंग लावणे, सुटे भाग एकमेकांना जोडणे अशी एक ना अनेक कामे रोबोटस् करत असतात. सध्या मोठमोठय़ा कारखान्यांत फक्त रोबोटस्ला प्रोग्राम बनवून दिला जातो मग रोबोटस् त्या प्रोग्रामप्रमाणे काम करत जातो. अशा प्रकारचे रोबोटस् जर्मनी आणि जपानवरून मागवले जातात. रोबोटस् मोठमोठी कामे करू लागल्यामुळे सध्या उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढले आहे आणि त्याची गुणवत्तादेखील सुधारली आहे.
सध्या आपल्या महाराष्ट्रात रोबोटस्ने अजून एक धम्माल उडवून दिली आहे. आपल्या नागपूर या शहरात साक्षात एक हॉटेल सुरू झाले आहे. त्यात चक्क माणसाऐवजी रोबोटस् वेटरचे काम करत आहेत. नागपूरच्या इटर्निटी मॉलमध्ये एक रोबो हॉटेल सुरू झाले आहे. त्याचे नाव आहे ‘रोबो टू पॉइंट झीरो’ आणि त्याची खासियत म्हणजे हे रोबोटस् चक्क मनुष्याप्रमाणे त्यांच्या गिऱहाईकांना कोणता पदार्थ खाणार याची चौकशी करतात, मेनू कार्ड आणून देतात आणि त्यांच्याकडून आपल्याला आवडणाऱया चमचमीत पदार्थांची ओर्डरदेखील घेतात. सध्या या हॉटेलमध्ये तीन रोबोटस् आहेत. हे रोबोटस् एका मॅग्नेटिक पाथ म्हणजेच मार्ग बनवण्यात आला आहे त्यावर चालतात. आलेल्या नवीन ग्राहकांना अभिवादन करून त्यांच्याकडून पदार्थांची ऑर्डर घेतात. अशा प्रकारे सगळय़ा हिंदुस्थानात सध्या हे पहिलेच हॉटेल आहे जिथे चक्क रोबोटच्या सहाय्याने ग्राहक सेवा पुरवली जात आहे. काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकनेदेखील त्यांच्या बँकेत अशा प्रकारची सेवा सुरू केली आहे.
अशा प्रकारची सेवा सुरू केल्यामुळे ‘रोबो टू पॉइंट झीरो’मध्ये ग्राहकांची रोबोट वेटर बघण्यासाठी खूप मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. ग्राहक रोबोटस्सोबत धम्माल करत चक्क सेल्फीदेखील काढत आहेत. त्यामुळे सध्या तरी रोबोटस् आणि यांत्रिकीकरणामुळे लोकांचा रोजगार वाढला आहे असे म्हणावे लागेल. चीनच्या शांघायमधून आलेल्या रोबोटस्ने हॉटेलच्या दुनियेत दमदार प्रवेश टाकला आहे आणि पिझ्झा डिलिव्हरीचा साधा ड्रोन ते चक्क ऑर्डर घेणारा रोबोट ही तंत्रज्ञानाची प्रगती खूपच वेगात झाली आहे. आता बघायचं आहे की, भविष्यात हे रोबोटस् आणि कोणकोणत्या क्षेत्रावर चढाई करतात आणि काय काय धम्माल उडवून देतात.





























































