
महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (मसुब) जवानांना आता ‘अमेरिकन पॅटर्न कोब्रा प्रिंट’ असा नव्या पॅटर्नचा गणवेश घेण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय जवानांच्या ओळखपत्रांमध्येदेखील बदल करण्यात आले आहेत. यामुळे मसुब जवानांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सीआयएसएफच्या धर्तीवर असलेला गणवेश कायम राहू द्या अशी जवानांनी मागणी आहे.
राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी मसुब जवानांना तैनात करण्यात येते. रुग्णालये, सरकारी कार्यालये, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी मसुब जवान डय़ुटीसाठी असतात. या जवानांना सीआयएसएफप्रमाणे गणवेश देण्यात आला होता, मात्र या गणवेशात बदल करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. पण अधिकारी बदलले आणि गणवेश आहे तसा कायम राहिला. मात्र मसुब महामंडळाच्या माजी अधीक्षक प्रज्ञा जेडगे यांनी 21 सप्टेंबर रोजी नवा आदेश जारी करत जवानांचा गणवेश बदलून त्यांना अमेरिकन पॅटर्न कोब्रा प्रिंट असलेला गणवेश घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. शिवाय जवानांचे ओळखपत्रदेखील बदलण्यात आले आहे. नवीन गणवेश व इतर साहित्य घेण्यासाठी जवानांना दोन हजार 490 रुपये भत्तादेखील देण्यात आला आहे. मात्र नवीन ड्रेस आणि ओळखपत्र बदलण्याच्या निर्णयाबाबत मसुब जवानांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीआयएसएफच्या धर्तीवर असलेला गणवेशच कायम ठेवून ओखळपत्रातदेखील बदल करू नये अशी जवानांची मागणी आहे.




























































