
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील 86 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱयांचा पगार पुन्हा लटकला आहे. महायुती सरकारने सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीचा निधी देण्यास विलंब केला. त्याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. सरकारने बुधवारी सायंकाळी उशिरा सवलत मूल्य प्रतिपूर्ती निधीचा जीआर काढला. मात्र बॅंक खात्यात पगाराचे पैसे जमा होण्यास आणखी एक दिवस लागणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांची निराशा झाली.
एसटी कर्मचाऱयांच्या पगाराबाबत गेल्या वर्षीपासून रखडपट्टी सुरू आहे. गेल्या वर्षी कामगार संघटनांनी आवाज उठवला होता. त्यावर एसटी कर्मचाऱयांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेलाच देऊ, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. मात्र मार्चच्या पगारासाठीची 7 एप्रिलची डेडलाईन पुन्हा चुकली. कर्मचाऱयांना किमान दुसऱया दिवशी म्हणजेच बुधवारी पगार बँक खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा होती. त्याच आशेने कर्मचारी आपल्या मोबाईलवर पगाराच्या मेसेजची वाट होते. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर सरकारने सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 448.21 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत जीआर काढला. प्रत्यक्षात तो निधी महामंडळाच्या खात्यात व नंतर कर्मचाऱयांच्या खात्यात जमा होण्यास आणखी एक दिवस जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या रखडपट्टीनंतर कर्मचाऱयांच्या बँक खात्यात पगाराचे पैसे जमा होण्याची चिन्हे आहेत. पगाराच्या या अनियमिततेमुळे राज्यभरातील 86 हजारांहून अधिक कर्मचाऱयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.


























































