यंदा नवी पाठय़पुस्तके, नवा गणवेश विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळांची लगबग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत वह्यांची पाने जोडलेली नवीकोरी पाठय़पुस्तके मिळणार असून शाळेच्या नियमित गणवेशासोबतच फिकट निळय़ा रंगाचा शर्ट आणि गडद निळय़ा रंगाची पॅण्ट असा नवीन गणवेशही मिळणार आहे. हा गणवेश विद्यार्थ्यांना आठवडय़ातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी घालावा लागणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून रांगोळय़ा, पायघडय़ा, गुलाबपुष्प वाटप, लेझीमच्या गजरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येतो. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांचे फूल किंवा अन्य शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शाळेतील वातावरण उत्साहवर्धक आणि चैतन्यमय राहावे, अशी काळजी शाळांमधून घेण्यात येते. दरवर्षी शालेय शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सव राबविण्याच्या लेखी सूचना जारी करण्यात येतात. यंदा मात्र शिक्षण विभागाकडून तशा कोणत्याही सूचना शाळांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शाळांनी आपापल्या स्तरावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची तयारी केली आहे.

शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱया विद्यार्थ्यांचे स्वागत वाजतगाजत आणि फुले देऊन करण्यात येईल. शाळांना आपापल्या स्तरावर नियोजन करण्यास सांगितले आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, पाठय़पुस्तकांसह इतर 27 वस्तूंचे वाटप होणार आहे.
राजेश पंकाळ, शिक्षणाधिकारी

स्काऊट-गाईड विषय यंदापासून नाही?

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात स्काऊट-गाईड हा विषय सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या विषयासाठी विद्यार्थ्यांना नवीन गणवेशही दिला जाणार आहे. मात्र या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबतच्या लेखी सूचना अद्याप जाहीर झालेला नाही. स्काऊट-गाईड हा विषय सुरू करायचा असल्यास 57 ऑप्शनल विषयांमध्ये या विषयाचा समावेश करावा लागणार आहे.