निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maharashtra-budget

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे पडसाद राज्य सरकारच्या याही अर्थसंकल्पात उमटणार असून शेतकरी आणि मध्यमवर्गाला खूश करणाऱ्या लोकप्रिय घोषणांचा पाऊसच या अर्थसंकल्पात पडणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सन 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील. या पार्श्वभूमीकर दोन्ही मंत्र्यांनी सोमवारी अतिरिक्त अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांठी भरीव तरतूद असणार आहे.

अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच पिक विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. तरीही सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत आहे. ही मागणी सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा होऊ शकतात. समृद्धी महामार्ग, मेट्रो, अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पातही तरतूद केली जाणार आहे.

धनगर समाजाच्या मागण्यांचे प्रतिबिंब

अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या मागण्यांचे प्रतिबिंब उमटेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याआधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मराठा समाजाला जाहीर करण्यात आलेल्या योजनांप्रमाणेच धनगर समाजासाठीही भरीव योजनांची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.