महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात सरकारने करावी; शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेची आयुक्तांकडे मागणी

अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारच्या वतीने चालवली जाते, मात्र एवढे असून महाराष्ट्र राज्य लॉटरीला लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही लॉटरी इतर राज्यांच्या लॉटरीच्या तुलनेत मागे पडली आहे. त्यासाठी राज्य लॉटरीने स्वतःची ऑनलाईन लॉटरी सुरू करावी, परराज्यातील लॉटरीवर नियंत्रण ठेवावे आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात राज्य सरकारने स्वतः करावी, अशी मागणी शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभुतार यांच्याकडे केली आहे.

मंत्रालयात आज लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभुतार यांची शिवसेना लॉटरी सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य लॉटरीला गेल्या 55 वर्षांची गौरवशाली व विश्वासार्ह परंपरा आहे. मुंबईसह राज्यभरात या लॉटरीवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र गेल्या काही वर्षांत अत्यंत पारदर्शी असलेली ही लॉटरी इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडली आहे. इतर राज्यांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत पुढे मुसंडी मारली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीपेक्षा इतर राज्यांचा लॉटरीचा सर्वात जास्त खप आपल्या राज्यात होता. यासाठी सरकारने लॉटरीच्या विक्रीत वाढ होण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या पाहिजे, अशी मागणी लॉटरी विव्रेता सेनेने लॉटरी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी सरचिटणीस सिद्धेश पाटील, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विश्वजीत मयेकर, मुंबई शहर लॉटरी संपर्कप्रमुख संतोष तोडणकर, मुंबई उपनगर लॉटरी संपर्कप्रमुख संदीप महिडा, लॉटरी विव्रेते संतोष म्हापुसकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.