
‘खालिद का शिवाजी’ या मराठी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे संवाद आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारीनंतर हा वाद आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे सिनेमाची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे आणि तोपर्यंत सिनेमाचे प्रदर्शन तात्पुरते थांवण्याची विनंतीही केली आहे.
सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. ‘खालिद का शिवाजी’ या सिनेमाला 12 नोव्हेंबर 2024 रोजी सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले. मात्र या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित संवाद वस्तुस्थितीला धरून नाहीत आणि सार्वजनिक भावना दुखावणारे आहेत, अशी तक्रार नीलेश भिसे यांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी सांस्कृतिक विभागाकडे केली असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या सिनेमावरून राज्यात विविध ठिकाणी तीव्र निदर्शने होत आहेत. राज्य चित्रपट पुरस्कार समारंभातही या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी उठली होती. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची भीतीही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
8 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने सार्वजनिक भावना आणि शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या सिनेमाची फेरतपासणी करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाला द्याव्यात, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
…सिनेमाच्या ट्रेलरमधील या संवादावर आक्षेप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के सैनिक मुसलमान होते आणि त्यांचे 11 अंगरक्षकही मुसलमान होते. महाराजांनी मुस्लीम सैनिकांसाठी रायगडावर मशीद बांधली होती, असे संवाद ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये समाविष्ट आहेत. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.