यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन, शालेय शिक्षण विभागाची चाचपणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाची दहावी-बारावीची परीक्षा घेण्याविषयी शालेय शिक्षण विभागाची चाचपणी सुरू झाली असून नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत दहावी- बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी समोर आली आहे. बोर्डाच्या परीक्षांविषयी चर्चा करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत परीक्षांच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली.

बैठकीला उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली. परीक्षा काळात कोरोनाची तिसरी लाट आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, परीक्षा कशा घ्याव्यात याविषयीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-कॉलेजही सुरू झाली आहेत. त्यामुळे यंदा परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात की ऑफलाइन याविषयी मते जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दहावी-बारावीच्या परीक्षा कधी व कशा घ्याव्यात, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का, लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी तयार आहेत का, या विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात 15 जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण झाला असून बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यांची तयारी झाली आहे. राज्य ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले, कोरोनाची सध्याची स्थिती पाहता बोर्डाची परीक्षा ऑफलाइन घेण्यास या बैठकीत सर्वांचे एकमत झाले आहे. विद्यार्थी आता शाळा-कॉलेजमध्ये येऊ लागल्याने ऑफलाइन परीक्षा घेणे योग्य ठरेल, असेही आंधळकर म्हणाले.

कोरोनाची लाट आल्यास सज्ज राहणार

शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले, शाळा-कॉलेजस्तरावर विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि प्रथम सत्र परीक्षाही झाली आहे. अभ्यासक्रमही शिकवून पूर्ण झाला आहे. अशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास शाळा अंतर्गत मूल्यमापनासाठी सज्ज असतील. पुढे तशी परिस्थिती उद्भवल्यास अंतर्गत मूल्यमापनासाठी नियोजन केले जाऊ शकते.

पुन्हा आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात की कशा याविषयी शासन स्तरावर स्वतंत्रपणे आढावा बैठक घेतली जाणार असून याविषयी राज्यातील शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.