सरकार टक्केवारी, भ्रष्टाचारात दंग! शिवसेना विधान परिषदेत आक्रमक; गृहमंत्र्यांना घाम फोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यमान सरकार जनहिताऐवजी फक्त टक्केवारी आणि भ्रष्टाचार करण्यात दंग आहे, असा आरोप करतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत केला. राज्यातील बिघडलेली कायदा- सुव्यवस्था, मोठय़ा प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून अंबादास दानवे यांनी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले.

अंबादास दानवे हे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आक्रमक झाले होते. सरकार जनतेच्या मुळावर व शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त सरकारने एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही पॅकेज दिले नाही. हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले असून राज्याला विकासापासून दूर नेण्याचा प्रयत्न करणारे आहे, असा आरोप दानवे यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात असमर्थ

विद्यमान सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यात असमर्थ ठरले असल्याचेही दानवे म्हणाले. हे सरकार कायदा व्यवस्थेचे भक्षक असल्याची टीकेची झोड उठवत दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.

दिवसाढवळय़ा खून पडताहेत

राज्यात संघटित गुन्हेगारीत झालेली वाढ,  दिवसाढवळय़ा होत असलेले खून, महिला अत्याचार, राज्यात मोठय़ा प्रमाणात झालेल्या दंगलीच्या घटना या सर्व राज्याला भूषणावह नाही, असे दानवे म्हणाले.

गृहमंत्री अपयशी

नागपूरमध्ये महिला अत्याचार, खून, दरोडे यांसारख्या गुह्यात वाढ झाली असून येथील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळतेय. गृहमंत्री असूनही त्यांच्या जिह्यात कायदा- सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका दानवे यांनी केली.

मुंबईप्रमाणे नागपूर, पुणे महापालिकेची चौकशी करा

महानगरपालिकांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावरही दानवे यांनी यावेळी बोट ठेवले. मुंबई महानगरपालिकेत मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली लूट, रखडलेल्या पालिका निवडणुका, सिडकोने 67 हजार घरांची विक्री करण्यासाठी खासगी संस्थेसाठी 699 कोटी रुपयांची काढलेली निविदा याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात लूट आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू असून मुंबई महापालिकेप्रमाणे नागपूर, पुणे महानगरपालिकांचीही चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

कुणाचे दलाल होण्यापेक्षा जनतेचे संरक्षक व्हा – अनिल परब

शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला धारेवर धरले. गौतमी पाटील ते ललित पाटील भ्रष्टाचार ते धारावी अशा विविध मुद्दय़ांवरून त्यांनी ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. कुणाचे दलाल होण्यापेक्षा जनतेचे संरक्षक व्हा, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

ललित पाटीलने महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावला

ललित पाटीलने तर महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावला आहे. ही कायदा-सुव्यवस्था कशी विकत घेतली जाते, कशी भंग पावली आहे, कसा महाराष्ट्र सुरक्षित नाही हे या प्रकरणाने चव्हाटय़ावर आले आहे, मुंबईत तर अशी परिस्थती आहे की कुठल्याही हुक्का पार्लरवर जा आज तिथे ड्रग्ज मिळतेय, असे परब म्हणाले.

सरकारचा नंदीबैल म्हणतो, नाही नाही

हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला. हाताला काळ्या पट्टय़ा बांधून यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, वैभव नाईक, राजन साळवी, रवींद्र धनगेकर यांच्यासह इतर आमदार या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या काळात जनतेचे कोणतेच प्रश्न राज्य सरकारला सोडविता आले नाहीत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का, पेपरफुटीवर कडक कायदा झाला का, परीक्षा फी कमी झाली का, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले का, आशा सेविकांचे प्रश्न सुटले का, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय दिला का, कर्मचारी भरती सुरू झाली का, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असल्याची टीका या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली.