धाराशीवमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’, 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगणार थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 तब्बल 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशीवमध्ये पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये ही 65 वी कुस्ती स्पर्धा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हातलाई कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील हे या स्पर्धेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत.

माती विभाग व गादी विभाग दोन गटांत होणारी ही स्पर्धा धाराशीव शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी (दि. 11) स्टेडियमची पाहणी केली व त्यानंतर ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा धाराशीवमध्ये होणार असल्याची घोषणा केल्याचे समजते. पाच दिवस चालणाऱया या स्पर्धेचे वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाणार आहे. या पाहणी दौऱयासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष दयानंद भक्त, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त विजेते काकासाहेब पवार, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, तांत्रिक सचिव बंकट यादव, हातलाई कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील, राष्ट्रीय खो-खो महासंघाचे सचिव चंद्रजीत जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.  याआधी धाराशीव व लातूर जिल्हा एकत्र असताना 25 नोव्हेंबर 1969 साली लातूर शहरात डालडा मैदान येथे ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे अधिवेशन भरले होते. त्यावेळी हरिश्चंद्र बिराजदार यांनी मानाची चांदीची गदा जिंकली होती. त्यानंतर थेट या वर्षी  धाराशीवला ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे यजमानपद मिळत आहे.

विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव!

तब्बल 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशीव जिह्याला ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे यजमान मिळत आहे. त्यामुळे विजेत्या कुस्तीपटूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्याचे स्पर्धा संयोजकांनी ठरविले आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास मानाची चांदीची गदा व स्कॉर्पिओ गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे. इतर वजनी गटातील विजेत्यांना बुलेट, तर उपविजेत्या व तृतीय क्रमांकावरील कुस्तीपटूंना अनुक्रमे 25 हजार व 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.