
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ अशी ओळख असलेली ‘लालपरी’ लवकरच नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. एसटी महामंडळाच्या बस गाडय़ांच्या वेळापत्रकात प्रवासी संख्या आणि उत्पन्न विचारात घेऊन बदल केला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला बस स्थानकांनिहाय बस गाडय़ांचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
एसटी महामंडळाने उत्पन्नवाढ आणि प्रवाशी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. त्याबाबत शुक्रवारी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. बैठकीत एसटीच्या नव्या वेळापत्रकासह विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱया बस गाडय़ांच्या वेळापत्रकाबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत आता एसटी बस गाडय़ांच्या सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱयाच चालवल्या जाणार आहेत. त्यानुसार राज्यभरात 1 जानेवारीला बस स्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा
राज्यभरातील प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठीही एसटी महामंडळाने पाऊल उचलले आहे. त्यानुसार दरदिवशी सकाळी 10 वाजता आगारात, 11 वाजता विभागात आणि 12 वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य केली आहे. प्रवाशी तक्रारी, रद्द फेऱया, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्यात येणार आहे.
लांब-मध्यम पल्ल्याच्या बस गाडय़ांना नवे मापदंड
आरक्षणासाठी उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान 80 टक्क्यांपेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱया दिवशी जादा फेऱयांची उपलब्धता, प्रत्येक फेरीची देखरेख, पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱया देणे अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या बस गाडय़ांच्या व्यवस्थापनात केल्या जाणार आहेत. तसेच ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे आरक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

























































