पुन्हा तारीख पे तारीख; सत्तासंघर्ष सुनावणी 22 ऑगस्टला

supreme court

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील सुनावणीला मुहूर्तच मिळत नाही. संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा काय निकाल लागणार याकडे देशभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

12 ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. परंतु आज ती दहा दिवस पुढे ढकलली गेली आहे. आता 22 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. देशातील लोकशाहीसाठी या याचिकांवरील निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. परंतु सुरुवातीपासूनच या याचिकांना ‘तारीख पे तारीख’ असा अनुभव येत आहे. 8 ऑगस्टवरून 12 ऑगस्ट आणि आता पुन्हा 22 ऑगस्टपर्यंत सुनावणी लांबणीवर गेली आहे. सर्व याचिका पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवणे यासह अन्य मुद्दय़ांवर या सुनावणी वेळी निर्णय होईल असे न्यायालयाने सूचित केले होते.