
मशिदीवरील भोंगे उतरवा अशी मागणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादीने दुसऱया जातीचा द्वेष निर्माण केला. त्यातून समाजात फूट पडली असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसते असे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोंदवले असून ईडीने एकदा बोलावले आणि मनसेचे इंजिन वेगळय़ाच ट्रकवर गेले असा टोला छगन भुजबळ यांनी हाणला आहे.
राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचली तर जातपात समजेल आणि जातीपातीचे जन्मदातेही समजतील. शरद पवार यांचे नाव घेतले की, महाराष्ट्रात चर्चा होते हे गणित डोक्यात ठेवून काही जण भाषण करतात. जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहात? झेंडा पाहून घ्या. विषय संपवा. निळा भगवा, हिरवा. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला लावणे, असा राज ठाकरे यांचा प्रवास आहे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे तर देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी देशाचे राजकारण बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांच्या बाजूने वातावरण बदलण्याची गरज आहे. राज्यात जे पोलिटिकल वॉर सुरू आहे ते गँगवॉर होऊ देऊ नका. त्यासाठी भाजप व महविकास आघाडीने स्तर सांभाळला पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कोहिनूर टॉवर हलायला लागला – छगन भुजबळ
ईडीने एकदा बोलावले अन् मनसेचे इंजिन वेगळ्याच ट्रकवर गेले, त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे हेच कळायला मार्ग नाही. कोहिनूर टॉवर हलायलाच लागला, असा खोचक टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला.
नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे हे भाजपाला कडवा विरोध करत होते. कालचा त्यांचा मेळावा मनसेचा होता की भाजपाचा, हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी माझ्यावरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केल्याने मलाही त्रास झाला. पण, मी रस्ता बदलला नाही. राष्ट्रवादीने मला त्याचे बक्षीस दिले, मंत्रीपद दिले. यांना तर ईडीने एकदाच बोलावलं अन् इंजिन वेगळ्याच ट्रकवर गेलं. कोहिनूर टॉवर हलायलाच लागला. त्यांनी काय ते स्पष्ट सांगावं, आडवळणाने बोलू नये. कालच्या मेळाव्यात फक्त भाजपाचे झेंडे नव्हते, प्रचार मात्र भाजपाचाच होता. आता महापालिका निवडणुकीसाठी भाजपा राज ठाकरे यांना बरोबर घेते की नाही ते बघायला लागेल. प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली, असेही भुजबळ म्हणाले.
चार महिने भूमिगत असतात, मग एखादे लेक्चर देतात!
राज ठाकरे बरेच महिने कुठे भूमिगत झाले होते याचा कुणालाही अंदाज येत नाही. दोन चार महिने कुठे तरी भूमिगत होतात आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने काय करतात हे मला माहीत नाही. त्यांनी गेल्या काही वर्षांतील राष्ट्रवादीचा इतिहास तपासावा, अशा शब्दांत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे की नाही याबाबत राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास तपासावा. राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसते असे निरीक्षण नोंदवून शरद पवार पुढे म्हणाले की, बरेच महिने ते कुठे भूमिगत झाले होते याचा कुणाला अंदाज येत नव्हता हेच त्यांचे वैशिष्टय़ आहे, असा टोलाही लगावला.
राज ठाकरे यांना नकलेशिवाय आणि टीकेशिवाय काहीच जमत नाही. एकेकाळी निवडून आलेले चौदा आमदार आपल्याला सोडून का गेले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. फक्त भाषणे करून जनतेचे प्रश्न किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे सतत पलटी मारतात. विधानसभेच्या काळात त्यांनी काय केले आणि गुढीपाडव्याच्या सभेत काय केले तेही पाहिले. त्यामुळे राज ठाकरेंचे सरडय़ासारखे रंग बदलण्याचे काम चालले आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
आता आम्हाला थोडासा वैद्यकीय अभ्यास करावा लागेल की, अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. भाजपचा लाऊडस्पीकर काल छत्रपती शिवाजी मैदानावर वाजत होता. स्क्रिप्ट त्यांची होती. टाळ्या व घोषणाही त्यांच्या होत्या. तुमच्या भोंग्याचे व यांच्या भोग्यांचे काय करायचे यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवार यांनी जातीयवाद पसरवला असे ते म्हणतात मग सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी राज ठाकरेही जात होते.
– संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार































































