राममंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठिंबा

477

महाविकास आघाडीला शंभर दिवस पूर्ण होताच यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱयावर गेले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचाही सहभाग असल्याने साहजिकच प्रभू श्रीरामांच्या मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठिंबा असल्याची भूमिका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदिराबाबत गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर निकाल देऊन मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला होता. पाठोपाठ महाराष्ट्रात नव्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सरकारचे शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारचे शंभर दिवस पार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. या दौऱयात महाविकास आघाडीचे मंत्रीही सहभागी झाले आहेत. प्रभू श्रीरामांच्या मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या