दिवंगत भाजप नगरसेवकाच्या फेकबुक अकाऊंटवरून महाविकास आघाडी टार्गेट

दिवंगत भाजप नगरसेवकाच्या नावाने फेकबुक अकाउंट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. मृत नगरसेवकाच्या नावाने फेसबुक अकाउंटवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर एका संशयिताला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यानंतरही फेसबुकवर पोस्ट होत असल्याने पोलिसांनी एका निरपराध तरुणाला ताब्यात घेतले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर एक फेक अकाउंट चालविले जात आहे. या अकाउंटवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या पोस्ट टाकण्यात येत होत्या. या प्रकरणी हे अकाऊंट चालवणाऱ्याला पकडण्याऐवजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदाधिकारी चंद्रेश यादव याला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माजी नगरसेवक अमित सरैया गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. तर त्यानंतर दिवंगत विलास कांबळे यांचे बंधू सुरेश कांबळे हे श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांना मिंधे गटाने मारहाण केल्याचा आरोप कांबळे यांनी केला.

पोलीस ठाणे मिंधे गटाची शाखा
श्रीनगर पोलीस ठाणे हे मिंधे गटाची शाखा झाली आहे. चंद्रेश यादव हा गरीब घरातील मुलगा असून त्याला पोलिसांनी नाहक ताब्यात घेऊन मारझोड केली. जर चंद्रेश यादव हे फेक अकाउंट चालवत असता तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच ‘टायगर अभी जिंदा है’ अशी पोस्ट आलीच कशी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी केला आहे.