
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजयी गुलाल उधळला असून भाजपचा धुव्वा उडाल्यामुळे त्यांचा भोंगा चिरकला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या दणदणीत विजयी झाल्या. जयश्री जाधव यांना 97 हजार 332 मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा 19 हजार 307 मतांनी पराभव केला. सत्यजित कदम यांना 78 हजार 025 मते मिळाली. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीरनगरीतून विजयी झालेल्या जयश्री जाधव या पहिल्या महिला आमदार ठरल्या.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी अपक्षांसह 15 उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत झाली. निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नेत्यांकडून महिलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांना ‘ईडी’च्या कारवाईची धमकी दिली. सभेत दगडफेक झाल्याचा कांगावा करण्यासह काही नेत्यांनी गुन्हेगारीच्या नावाखाली कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामासह सनातन धर्माच्या घोषणा देऊन निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आदींनी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात केलेल्या मार्गदर्शनानंतर शिवसैनिकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि जयश्री जाधव यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
आदित्य ठाकरे यांच्याकडून ट्विटद्वारे अभिनंदन
‘कोल्हापूर उत्तर विधानसभेतील जागा जिंकल्याबद्दल महाविकास आघाडीच्या जयश्री जाधवताई यांचे हार्दिक अभिनंदन तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी मतदान केल्याबद्दल मतदारांचे खूप खूप आभार मानतो,’ असे ट्विट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
सहानुभूतीमुळे काँग्रेसला विजय – फडणवीस
कोल्हापूरमध्ये काँग्रेसला विजय हा केवळ सहानुभूतीमुळे मिळाला आहे. 2024 मध्ये या जागेवर भाजपचाच उमेदवार जिंकणार हा माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. भाजप-शिवसेना एकत्र असताना जेवढी मते मिळत होती त्यापेक्षा जास्त मते भाजपला मिळाली आहेत. तीन पक्ष एकत्रित असतानाही भाजपला जास्त फायदा झाला, असा दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीची एकजूट अन् कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा हा विजय – जयश्री जाधव
विधानसभा पोटनिवडणुकीतील आपला हा विजय काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. पुढील काळात सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. कोल्हापूरकरांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया आमदार जयश्री जाधव यांनी विजयानंतर दिली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी
राजाराम तलाव येथील सरनोबतवाडी येथील प्रशासकीय इमारतीत सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतमोजणी झाली. जयश्री जाधव यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या म्हणजे 26 व्या फेरीपर्यंत कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला.


































































