
पुण्यात ‘महावितरण’च्या किन्हई शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. दरम्यान, या अभियंत्याने मृत्यूपूर्वी लिह्लेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सूरज सुधीर देसाई (वय 26) असे मृताचे नाव आहे. वाठार स्टेशन उपविभागीय कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात किन्हई येथे शाखा कार्यालय आहे. गारगोटी (जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेला युवक सूरज देसाई हा काही महिन्यांपूर्वीच कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला होता.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोबाईल बंद होता. कोरेगावात एकत्रित राहत असलेले त्यांचे रूम पार्टनर त्यांच्याशी संपर्क करीत होते. मात्र, संपर्क होऊ शकत नव्हता.
रविवारी सकाळी किन्हईतील शाखा कार्यालय उघडल्यानंतर सूरज देसाई यांनी कार्यालयातच गळफास घेतल्याचे दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह सातारा रोड पोलीस औट पोस्टचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांनी तातडीने किन्हई येथे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तेथे एक चिठ्ठी सापडली आहे.
सायंकाळी 5.30च्या सुमारास गारगोटीहून वडील सुधीर देसाई यांच्यासह कुटुंबीय व नातेवाईक किन्हई येथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर तो कोरेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. कोरेगाव पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करीत आहेत.
महावितरणचे सातारा जिल्हा अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील माने, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे (वाठार स्टेशन), अभिजित महामुनी (कोरेगाव) यांच्यासह जिह्याच्या विविध भागांतून सहायक अभियंते, शाखा अभियंत्यांनी किन्हई येथे गर्दी केली होती.
‘किन्हई येथे आत्महत्या केलेल्या सूरज देसाई यांची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. देसाई कुटुंबीय सायंकाळी उशिरा आले आहेत. कुटुंबीय, वीज वितरण कंपनीतील अभियंते आणि कर्मचाऱ्य़ांचे जाबजबाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतर आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकणार आहे.’ – गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी.






























































