
राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना आता वीज बिलापोटी जास्तीत जास्त पाच हजार रुपये रोखीने भरावे लागणार आहेत. 1 ऑगस्टपासून वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार रोखीने वीज बिलाबाबतची मर्यादा लागू होणार आहे. त्यामुळे रोखीने वीज बिल भरणाऱया वीज ग्राहकांची मोठी कोंडी होणार आहे. पाच हजार रुपयांपेक्षा जास्तीचे वीज बिल ऑनलाइन किंवा मोबाईल अॅपद्वारे भरावे लागणार आहे.
वीज नियामक आयोगाने 31 मार्च रोजी वीज दरवाढीचे निर्देश देताना रोखीने वीज बिल भरण्याची मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून महावितरण करणार आहे. त्यामुळे लघुदाब वीज ग्राहकांना रोखीने बिल भरण्याची मर्यादा पाच हजार रुपये एवढी तर शेतकऱयांना दहा हजार रुपये रोखीने भरता येणार आहेत. दरम्याने रोखीने वीज बिल भरण्यावर मर्यादा आणल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या संकेतस्थळाबरोबरच मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.



























































