कर्मचाऱ्यांच्या गृहकर्ज कपातील महावितरणची आडकाठी

440

घरबांधणीबरोबरच घरखरेदीसाठी महावितरणच्या अनेक कर्मचाऱ्यांनी विविध बँकांकडून गृहकर्ज घेतले आहे. त्याच्या परतफेडीचा मासिक हप्ता कर्मचाऱ्यांच्या आणि बँकेच्या मागणीनुसार आतापर्यंत महावितरण थेट पगारातून कापून देत होते. वर्षानुवर्षे चालत आलेली पद्धत कंपनीने बंद केली आहे. त्यामुळे आतापर्यंत वेळेत जाणारा कर्जाचा हप्ता थकीत राहण्याची भीती कर्मचारी व्यक्त करत आहेत.

आपल्या हक्काचे घर असावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी नोकरदार आपल्या पगाराच्या आधारे बँकांकडून कर्ज काढतात. सदर कर्जाच्या परतफेडीचा हप्ता कर्मचारी जर आपल्या पगारातून थेट वळता करून देणार असेल तर बँका किंवा आर्थिक संस्था सहजपणे कर्ज उपलब्ध करून देतात. त्यानुसार महावितरणही सध्या गृहकर्जाची कपात थेट पगारातून देत आहे. पण ती डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय कंपनीच्या मानव संसाधन विभागाने घेतला आहे. यापुढे कर्मचाऱयांनी आपल्या गृहकर्जाचा हप्ता आपल्या स्वतःच्या बचत खात्यातून द्यावे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांचा हप्ता आतापर्यंत पगारातून वळता केला जात होता त्यांना आता बँकेत जाऊन आपल्या बचत खात्यातून हप्ता देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. याचा फटका परतफेडीला बसणार असून ज्यावेळी पगार उशिरा होईल किंवा बचत खात्यावर पुरेसे पैसे नसल्यास आतापर्यंत वेळेत जाणारा कर्जफेडीचा हप्ता चुकण्याची शक्यता आहे.

नव्याने कर्ज घेणाऱयांची कोंडी होणार

कर्मचारी काम करत असलेली आस्थापना किंवा कंपनी कर्जाच्या परतफेडीचा हप्ता थेट पगारातून वळता करून देणार असेल तर तो थकीत राहण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे बँका संबंधिताला तत्काळ कर्ज मंजूर करतात, परंतु आता ही पद्धतच महावितरण बंद करणार असल्याने कर्मचाऱयाच्या बचत खात्यातून हप्ता घ्यावा लागणार आहे. त्यामुळे बँका कर्ज मंजूर करताना हात आखडता घेण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या