
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीत तडे गेले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप अजित पवार गटाविरोधात लढणार आहे. तसे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची युती होईल. काही ठिकाणी भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होईल. एखाद्या ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती होईल. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आमने सामने लढताना दिसेल. ही लढत मैत्रिपूर्ण असेल असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यात भाजपने पाच वर्षे चांगले काम केले आहे. त्यामुळे पुणेकर पुन्हा भाजपला संधी देतील असा विश्वास आहे. माझी अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे. आम्हा दोघांनाही पुण्याच्या राजकारणाची कल्पना आहे, त्यामुळे आम्ही दोघे एकत्रित निवडणूक लढवू शकत नाही. आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर तिसऱयाचा फायदा होईल हे आम्ही जाणतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.





























































