
राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांवर विविध सवलतींचा वर्षाव केल्याने एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे अखेर एसटीच्या तिकिटात 15 टक्के भाडेवाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे भविष्यात 100 रुपयांच्या तिकिटासाठी सुमारे 115 रुपये मोजावे लागतील.विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवत महायुती सरकारने एसटी प्रवाशांसाठी विविध योजना जाहीर केल्या. त्यात महिला प्रवाशांना तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत जाहीर केली. त्याशिवाय विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमुळे एसटीवर दररोज तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे,
तीन हजार कोटींची देणी
एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत आहे. महामंडळाची डिझेलची देणी देण्यासाठी 150 कोटी रुपये पीएफ ग्रॅच्युईटीसाठी दोन हजार कोटी रुपयांची देणी शिल्लक आहे. त्यासाठी महामंडळाला सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे वृत्त आहे.
समितीच्या निर्णयानंतर अंमलबजावणी
एसटीची 15 टक्के भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कारण भाडेवाढ करण्यासाठी प्राधिकरणाच्या मंजुरी हवी असते. या समितीने निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्षात भाडेवाढ लागू होईल.