पुण्याचा महेंद्र चव्हाण ठरला ‘महाराष्ट्र श्री’चा मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी… जागतिक स्पर्धेतही ठसा… ‘महाराष्ट्र श्री’तही धडाका… ही स्टोरी पुण्याच्या महेंद्र चव्हाण याची. या पठ्ठय़ाने सातारा येथे झालेल्या ‘महाराष्ट्र श्री’ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या अनिल बिलावाचे कडवे आव्हान मोडून काढत जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. या स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचेच वर्चस्व दिसून आले. सांघिक जेतेपद व उपविजेतेपदावर त्यांनीच हक्क सांगितला. मुंबईच्या अमला ब्रह्मचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव गटात सलग दुसऱयांदा ‘मिस महाराष्ट्र’चा मान संपादन केला. महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात उपनगरची दीपाली ओगलेने बाजी मारली.

शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, रवींद्र पवार यांनी ‘महाराष्ट्र श्री’च्या माध्यमातून सातारकरांना शरीरसौष्ठवाची पीळदार मेजवानी दिली. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा भारत विकास ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड, जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांतराव आपटे, सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे, उपाध्यक्ष राजेश सावंत, कोषाध्यक्ष शरद मारणे, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, रवींद्र पवार, स्थानिक नगरसेविका सिद्धी पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबई आणि उपनगरचेच वर्चस्व
यंदाही ‘महाराष्ट्र श्री’वर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट होते. 12 गटांपैकी सहा गटांत मुंबईकर खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. तीन सुवर्णांसह सहा रौप्य आणि दोन कास्य पदक पटकावणारा मुंबई उपनगरचा संघ 300 गुणांसह सांघिक विजेता ठरला तर तीन सुवर्ण आणि तीन रौप्य जिंकणारा मुंबईचा संघ सांघिक उपविजेता ठरला. येत्या 19 ते 22 मार्चला इंदूर येथे होणाऱया ‘भारत श्री’ स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱया राज्याच्या संघात मुंबईसह ठाणे, पुणे आणि कोल्हापूरची ताकद दिसून येईल.

अमला आणि दीपाली ठरली सरस
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या अमला ब्रह्मचारीचाच दबदबा दिसला. तिने शरीरसौष्ठव गटात सर्वोत्तम प्रदर्शन करताना ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद कायम राखले. गतवर्षीही अमलाने हा किताब जिंकला होता. या गटात उपस्थित एकही खेळाडू तिला आव्हान देऊ शकली नाही. तसेच महिलांच्या फिजिक स्पोर्टस् प्रकारात मुंबई उपनगरच्या दीपाली ओगलेने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेच्या फिजिक स्पोर्टस् प्रकारात तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत तिने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ‘मिस महाराष्ट्र’चा निकाल बदलण्याची करामत करून दाखवली. या दोन्ही गटांत सहभागी झालेल्या सर्व महिला खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.