
>> महेंद्र पाटील
आपल्या आयुष्यात काही गोष्टींचा क्रम ठरलेला असतो. सूर्य उगवला की, दिवसाची सुरुवात होते आणि प्रत्येक गोष्ट कशी ठरल्याप्रमाणे होत जाते. काही नातीसुद्धा जन्मापासून बांधलेली असतात, तर काही नाती नव्या ओळखीतून निर्माण होतात. काही टिकतात, तर काही नाही टिकत. प्रत्येक नात्याला जोडणारा एक दुवा असतो. तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. रक्ताचं नातं आपसूकपणे बांधलेलं असतं. त्यामुळे ती नाती जपत आपण जगत असतो. काही वेळेला इच्छा नसते एखादं रक्ताचं नातं जपण्याची, परंतु ते जपावं लागतं. कारण रक्ताची नाती खोडून काढण्याची सोय नसते.
मैत्रीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. या नात्यात खूप सारे पैलू पहायला मिळतात. मनातली प्रत्येक गोष्ट आपण ज्याच्याशी बोलू शकतो आणि हक्काने काहीही मागू शकतो असं हे मैत्रीचं नातं. कधी काही अनोळख्या व्यक्ती भेटतात आणि शब्दांची देवाणघेवाण होते. हळूहळू बोलणं वाढत जातं, एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न होऊ लागतो आणि उलगडत जातात दोघांच्याही मनातले भाव. मग सुरू होतात मनाच्या गुजगोष्टी.
समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतील हा विचार करत आपण त्या व्यक्तीच्या मनाचा थांग घेऊ लागतो तेव्हा जाणवतं, त्याचंही मन असंच काहीतरी करत असतं. दोघांच्याही मनातला प्रत्येक शब्द एकमेकांना कळू लागतो आणि आयुष्याची गाडी एका नव्या वळणावर वळू लागते. असंच एक वळण परवा संध्याकाळी अलगदपणे समोर आलं आणि एक अनोळखी भेट झाली. रीतिरिवाजाप्रमाणे ‘हाय-हॅलो’ झालं आणि हळूहळू ओळख वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. दोघांचे. तो चेहरा अनोळखी असला तरी इतकाही परका वाटत नव्हता. मी तिच्यासाठी अनोळखी असलो तरी तिला माझ्या शब्दांची ओढ होती. हळूहळू रात्र गडद होत होती. चांदण्याचा प्रकाश साऱया रानात पसरू लागला होता. आमच्या दोघांच्याही मनातले शब्द एकमेकांना भेटायला आतुर झाले होते. एक शब्द तिचा, एक शब्द माझा अशी गप्पांची मैफल रंगत गेली. का कोण जाणे, तो चेहरा आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करून माझ्याशी ओळख वाढवू पाहत होता, परंतु चेहरेही हुशार असतात. कारण त्यांच्यामागे मन दडलेलं असतं. म्हणून जोवर समोरच्या व्यक्तीची खरी ओळख पटत नाही तोवर ते कुंपणात असतात. परवा मात्र ते कुंपण तोडलं त्याने. कारण मनाला काहीतरी जाणवत होतं.
ती व्यक्ती उगाच अशा कातरवेळी एका निवांत वळणावर समोर येण्यामागचं कारण जरी आज नाही समजलं तरी भविष्यात मात्र नक्कीच समजेल. कदाचित हा माझ्या आयुष्याच्या पटकथेतला अँटिक्लायमॅक्स असावा. म्हणून मी बोलत गेलो. ती म्हणाली, शब्द हे मृगजळासारखे असतात. मी म्हटलं, शब्द हे शाश्वत असतात. कारण शब्दांची निर्मिती करणारा लेखक जरी या जगातून निवृत्त झाला तरी त्याची कीर्ती त्याच्या शब्दातून कायम राहतेच. त्याच शब्दांमुळे त्याचं नाव अजरामर होतं. हळूहळू तिलाही शब्दांची महती पटू लागली. मग तू म्हणालीस, सगळेच शब्द सारखे नसतात.
“अगं, सगळं कधीच सारखं नसतं. ना सावल्या, ना हाताची पाच बोटं, ना माणसं, ना विचार, ना नातीगोती, तर मग शब्दांचं काय घेऊन बसलीस. शब्द तर बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी असतात.” आता यापुढे ही ओळख कुठपर्यंत जाईल हे येणारा काळ ठरवेल. कोण ती, काय ती, अप्सरा की राणी, ती झुळूक वाऱयाची की परी गोड गुलाबी? परतीच्या वाटेवर चालता चालता पुन्हा एकदा ती समोर येईल तिची खरी ओळख घेऊन. कारण नवी ओळख असली तरी एका विशिष्ट नात्यात बांधलो गेलो होतो आम्ही त्या दिवशी आणि यावेळी आमच्या मनाला जोडणारा दुवा होता ‘शब्द’.
होय, तिचं-माझं नातं शब्दांनी जोडलं. तिच्या माझ्या मनाला एकमेकांच्या दिशेने शब्दांनीच ओढलं. ही ओढ मनात घेऊन माझे काही शब्द तिच्या मनात पसरले, तिचे काही शब्द माझ्या मनात बहरले. असं हे आमचं जगावेगळं नातं…एका शब्दाचं!