
माहीम समुद्रातील मजारीशेजारी करण्यात आलेल्या बेकायदेशीरपणे बांधकामावर आज सकाळी कारवाई करण्यात आली. मेरीटाइम बोर्ड, कलेक्टर आणि मुंबई महानगरपालिकेने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान किनार्याजवळ करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवरदेखील कारवाई करण्यात आली.
माहीम समुद्रात असलेल्या या मजारीजवळ गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी पालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडेदेखील आल्या होत्या. यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, नगर भूमापन व भूमी अभिलेख अधिक्षक, नायब तहसीलदार, सहायक अधिक्षक, महसूल सहायक, परीरक्षण भूमापक यांचे पथक नेमण्यात आले होते. यानुसार पालिका, पोलीस यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. दरम्यान, या कारवाईत पालिकेने समुद्र किनार्यालगतच्या असलेली बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. मात्र आपण या ठिकाणी गेल्या ५० वर्षांपासून राहत असल्याचा दावा संबंधित रहिवाशांकडून करण्यात येत असून पालिकेने आमची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.




























































