महिपत गडाच्या विकासासाठी 10 कोटींचा प्रस्ताव

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या काळात शत्रूंवर फत्ते मिळवून येणाऱ्या मावळ्यांना विश्रांती घेण्याकरिता सह्याद्रीच्या कुशीत सुरक्षित व तितकीच शांत अशी जागा हेरून महिपत गडाची उभारणी केली. कडाक्याच्या उन्हाळ्यातसुद्धा थंड वातावरण असल्यामुळे या गडाची वेगळीच ओळख आहे.

मात्र, आज या गडाचा प्रत्येक भाग ढासळू लागल्यामुळे तो हिंदवी स्वराज्याचा मूक साक्षीदार बनून राहिला आहे. या गडाच्या विकासासाठी निवेखुर्द ग्रामपंचायतीने 9 कोटी 85 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव गट विकास अधिकारी संगमेश्वर यांना सादर केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड किल्ल्याला नवी झळाळी मिळाल्यानंतर आता संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावाजवळील जवळील महिपतगडाचा विकास व्हावा आणि याला क दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी या गावाच्या शिखरावर आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या माथ्यावर हा गड आजही ऐतिहासिक दाखले देण्यासाठी उभा आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी कर्नाटकपर्यंतच्या मोहिमा यशस्वी केल्या. या सर्व लढायांत विजयी होऊन राजधानी रायगडावर जाण्याचा मोठा पल्ला पार करताना मावळयांची दमछाक होत असे. तशी ती होऊ नये, मावळयांसाठी एखादे विश्रांतीस्थान असावे या उद्देशाने शिवरायांनी म्हणून महिपत गडाची उभारणी केली. या गडाचा परिसर चार कि.मी. अंतराचा विस्तीर्ण असा आहे.

या गडाकडे जातानाच भव्य असे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारा जवळ कमान उभारण्यासाठी 20 लाख, बुरुज दुरुस्तीसाठी 30 लाख, बाग तयार करण्यासाठी 5 लाख, पाखाडी आणि रस्ते 40 लाख, विद्युत पुरवठा 60 लाख, स्वच्छता गृह 10 लाख, सांडपाण्याची व्यवस्था 15 लाख, स्वागत कक्ष आणि फलक 30 लाख, पुरातन मंदिरांची दुरुस्ती 25 लाख, गडावरील तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण 15 लाख, मंदिराभोवती तटबंदी 10 लाख, निगुडवाडी ते कुंडी रस्ता नुतनिकरण आणि डांबरीकरण 2 कोटी, आकर्षक झोपड्या, 30 लाख, वृक्ष लागवड 20 लाख, राष्ट्रध्वजाचा स्तंभ 5 लाख , पायथ्याजवळ गाडीतळ बांधणे 40 लाख, पुरातन वस्तू संवर्धन आणि संग्रहालय 30 लाख, कुंडी गावाकडून पाखाडी बांधणे 30 लाख , गाडीतळ ते गडापर्यंत पाखाडी बांधणे 30 लाख, तोफा दुरुस्ती आणि त्यांचे संरक्षण 3 लाख असा एकूण 9 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर यांना सादर करण्यात आला आहे . याची रचनाही वैशिष्टय़पूर्ण आहे. मात्र आज या प्रवेशद्वाराचे दरवाजे शेकडो वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नष्ट झाले आहेत.

येथील म्हसोबा हे देवस्थान नवसाला पावणारे असून ते अत्यंत कडक म्हणून प्रसिद्ध आहे. या गडावर शासकीय यंत्रणेद्वारे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी ध्वजारोहण केले जाते. यावेळी दोन पोलीस, तलाठी, कोतवाल व काही ग्रामस्थ उपस्थित असतात अशी माहिती येथील शांताराम गुरव यांनी दिली. या गडाची झालेली दुरवस्था व अस्वच्छता पाहून देवरूख येथील संस्कार समूहाने वर्षापूर्वी संपूर्ण गडाची साफसफाई केली होती. नुकतीच येथील ग्रामस्थांनी देखील या गडावर जाणाऱ्या वाटेची साफसफाई केली. आता या गडाच्या संपूर्ण विकासासाठी ग्रामपंचायती मार्फत 9 कोटी 85 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्ण गड पाठोपाठ आता महिपतगडाला नवी

या गडाच्या पायथ्याजवळूनच संगमेश्वर ते कराड असा जोडणारा कुंडी घाटाचा रस्ता जात आहे. मात्र हे कामही अर्धवट असल्यामुळे गडाकडे जाणारा मार्गच अंधुक बनला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पर्यटकांना गडाकडे जाणारा जवळचा मार्ग उपलब्ध होऊन पर्यटकांची संख्याही वाढेल, असा विश्वास येथील ग्रामस्थांना वाटतो आहे.

शिवरायांच्या या गडावर सौरऊर्जेचे दिवे लावणे, मंदिराची डागडुजी करणे व ऐतिहासिक स्मारक उभारून गडाचा विकास साधण्याच्या अनेक घोषणा स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा केल्या आहेत. मात्र आजपर्यंत यातील एकही गोष्ट त्यांच्या हातून साध्य झाली नसल्यामुळे येथील ग्रामस्थ व इतिहासप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. या गडावर जाण्यासाठी देवरूखहून कुंडी या गावाकडे जावे लागते व तेथून निगुडवाडी व कुंडीघाट असे दोन मार्ग आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या