रेखा झुनझुनवाला यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप, गेमिंग बिल येण्याआधीच 62 लाख शेअर विकले! महुआ मोईत्रा यांनी टाकला बॉम्ब

‘ऑनलाइन गेमिंग बिल’ संसदेत येण्याआधीच दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी नझारा टेक्नॉलॉजीज कंपनीतील सर्व 61.8 लाख शेअर्स विकले आहेत. त्यामुळे त्यांना तब्बल 334 कोटींचा नफा झाला आहे. यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी झुनझुनवाला यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप केला आहे. सर्वच्या सर्व शेअर विकण्याचा निर्णय त्यांनी नेमका याचवेळी कसा घेतला, असा संशय मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे.

गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म असलेल्या नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर मागील आठवडय़ात मोठय़ा  प्रमाणावर घसरले. त्यामुळे निखिल कामत व मधुसूदन केला यांचे 100 कोटींचे नुकसान झाले. ऑनलाइन गेमिंग बंदीमुळे हा फटका बसला. मात्र, झुनझुनवाला यांनी कंपनीतील सर्व शेअर जून महिन्यातच विकले. भलेभले गुंतवणूकदार शेअर होल्ड करून असताना रेखा यांनी अचूक निर्णय कसा घेतला, असा संशय मोईत्रा यांनी व्यक्त केला आहे. सरकारच्या निर्णयाची माहिती झुनझुनवाला यांना आधीच मिळाली होती. त्यामुळेच सर्व शेअर विकून त्यांनी नुकसान टाळले, असा आरोप मोईत्रा यांनी केला.

सेबी झोपेत! भक्त टाळ्या वाजवतात!

’झुनझुनवाला यांनी जे केले ते इनसायडर ट्रेडिंग हे स्पष्ट आहे. हे अमेरिकेत घडले असते तर तेथील सेक्युरिटी एक्स्चेंजने कसून चौकशी केली असती. मोबाईल फोन व डिजिटल रेकॉर्ड मागवले असते. हिंदुस्थानात असे काही घडते तेव्हा सेबी झोपलेली असते आणि भक्त टाळ्या वाजवत असतात,’ असा सणसणीत टोला मोईत्रा यांनी हाणला.