
सामना प्रतिनिधी । मुंबई
चेंबूर येथील ‘बीपीसीएल’च्या हायड्रो- क्रॅकर प्लांटमध्ये बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अचानक स्फोट झाला आणि क्षणार्धात आगीचे लोट पसरू लागले. या स्फोटाने संपूर्ण माहुलगाव परिसर हादरला. या स्फोटाची तीक्रता इतकी प्रचंड होती की, या परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले. प्रचंड आवाजाने घाबरलेले नागरिक घरदार सोडून बाहेर पळाले. रस्त्यावर एकच गर्दी जमली.
घटनेनंतर लगेचच ‘भारत पेट्रोलियम’च्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवाय कंपनीतील कामगारांनाही बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे व अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
‘बर्माशेल’ ते ‘बीपीसीएल’
२४ जानेवारी १९७६ मध्ये तेव्हाची ‘बर्माशेल ग्रूप ऑफ कंपनी’ भारत सरकारने विकत घेऊन या कंपनीचे ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ असे नामकरण केले. तेल आणि गॅस निर्माण करणाऱया या कंपनीची क्षमता वार्षिक १३ मेट्रिक मिलिनियम टन आहे. पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादनांचे संशोधन, निर्मिती आणि विक्री असे कामाचे क्षेत्र आहे.
प्रकल्पबाधितांचा प्रश्नही पेटणार
माहुल परिसरात प्रकल्पबाधितांची घरे असून येथील लोकांचा आधीच माहुलला विरोध आहे. शिवसेनेने याबाबत नेहमीच आवाज उठवला आहे. त्यातच आता ही घटना घडल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेटय़े यांनी व्यक्त केली.
मोबाईल सर्व्हर जॅम
ही दुर्घटना घडल्यानंतर या विभागातील मोबाईल सर्व्हर जॅम करण्यात आले होते. त्यामुळे कंपनीत काम करणाऱया कामगारांचे फोनही लागत नव्हते. परिणामी कामगारांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आणखीनच गोंधळाची स्थिती निर्माण केली.
बसमार्ग वळवले
आगीच्या दुर्घटनेमुळे माहुल गावाला जाणारे बेस्टचे बसमार्ग वळवण्यात आले. बसमार्ग क्रमांक- ३६१,३६३,३७४,३७३,४३०,४७३ चेंबूर कॉलनीपर्यंत चालविण्यात येत असल्याचे बेस्ट प्रशासनाने कळवले आहे.
आगीची घटना लक्षात घेता यापुढे अशी घटना उद्भवू नये यासाठी येथील पेट्रोलियम, रासायनिक कंपन्यांचे फायर ऑडिट झाले पाहिजे.
राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना
बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन लोकांना दिलासा देण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनीच लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
निधी शिंदे, शिवसेना नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्षा
या कंपन्यांच्या गाडय़ांच्या पार्ंकगमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. या गाडय़ांमध्ये फ्युएलच्या गाडय़ाही असतात. आजही या गाडय़ा इथेच उभ्या होत्या. त्यामुळे मदतकार्य करताना अडथळे येत होते.
प्रमोद शिंदे, उपविभागप्रमुख
जखमींची नावे
- भूषण पंडीत (४७)
- सरबजीत मंडल (२३)
- सुशील भोसले (३५, गंभीर)
- कृष्णमूर्ती (५७)
- अवधूत परब (४४)
- शोख मोहम्मद सौत (४०)
- नंदादीप वाळवे (५३, गंभीर)
- फिलीप कुरीयन (५३)
- नितीन म्हात्रे (५३)
- परमानंद तावरे (६०)
- अस्लम शेख (२९)
- विनय शेडगे (२१)
- संजय साखरे (३७)
- सुशील शिवणकर (२३)
- राहुल झुंजारराव (४१)
- सचिन सदाफुले (३२)
- शमीम खान (२३)
- अजय सुर्वे (४७)
- जयप्रकाश बापू कदम (५८)
- रमेश कुमार (२०)
- प्रसाद साटम (५४)
- विनोद पंडीत (४४)
- एकूण ४५ कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी २२ कामगारांवर बीपीसीएलच्या मेडिकल सेंटरमध्ये उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.
- २२ जणांवर सुश्रूत या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी दोघे गंभीर असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली, तर एकावर शताब्दी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले.
- सुशील भोसले (३५) हे गंभीर आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि मल्टिपल फॅक्चर आहे. नानंदीप वाळवे (53) हेदेखील गंभीर असून त्यांच्या खांद्याला, नाकाला, डोक्याला गंभीर दुखापती आहेत
जीव वाचवण्यासाठी धावत सुटलो
चेंबूरच्या बीपीसीएल रिफायनरी स्फोटात जखमी झालेल्या अनिलकुमार यांनी याचि देही याचि डोळा मृत्यू पाहिला. स्फोट झाल्यानंतर क्षणभर डोके अक्षरशŠ बधिर झाले. आहे त्या कपडय़ात जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटलो. स्फोटामुळे एक पत्रा उडाला आणि माझ्या पायाला लागला. अनिलकुमार यांनी स्फोटानंतरचा थरारक अनुभव सांगितला.
कानाचे दडे बसले
हा स्फोट इतका प्रचंड होता की, माझ्या कानाचे अक्षरशŠ दडे बसले. काही क्षण बहिरे झाल्यासारखे वाटल्याचे तुलसी यांनी सांगितले. तुलसी 402 क्रमांकाच्या युनिटमध्ये काम करत होते. स्फोटाचा आवाज झाल्यामुळे जिवाच्या आकांताने जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावत सुटल्याचे त्याने सांगितले.




























































