
मोबाइल शॉपी व्यावसायिकाकडून सहा लाखांच्या बदल्यात 35 लाखांचे व्याज वसूल करणाऱ्या मुख्य खासगी सावकाराला अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथक एकने दत्तनगर चौकात ही कारवाई केली. अथर्व अभय देशपांडे (वय 27, रा. कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने अथर्व देशपांडे यांच्याकडून सहा लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात आरोपीने त्यांच्याकडून 35 लाख रूपये व्याज वसूल केले होते. त्यानंतरही दर महिन्याला सात ते आठ हजारांची मागणी केली जात होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस आणि खंडणी विरोधी पथक एक समांतर तपास करीत होते. याप्रकरणी हवालदार शैलेश सूर्वे, राहुल उत्तरकर, प्रदीप शितोळे आणि पोलीस नाईक सचिन अहिवळे भारती विद्यापीठ परिसरात पेट्रोलिंग करीत होते. आरोपी दत्तनगर चौकात थांबल्याची माहिती सचिन अहिवळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अथर्व याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






























































